शाळांमधील स्वच्छतागृहे केवळ शोभेसाठी आहेत का? तपासणी समितीचे ताशेरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

शाळांमधील स्वच्छतागृहे केवळ शोभेसाठी आहेत का? तपासणी समितीचे ताशेरे

शाळांमधील स्वच्छतागृहे केवळ शोभेसाठी आहेत का? तपासणी समितीचे ताशेरे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील जिल्हा परिषद शाळेत उभारण्यात आलेली स्वच्छतागृहे प्रत्यक्षात वापरली का जात नाहीत, ती केवळ शोभेसाठीच ठेवली आहेत का, असा संतप्त सवाल जिल्हास्तरीय तपासणी समितीने उपस्थित केला आहे.

या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित यंत्रणेने तातडीने ही स्वच्छतागृहे वापरायोग्य करावीत, असे आदेश समितीने दिले आहेत.

जिल्हास्तरीय तपासणी समितीने बुधवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. या समितीमध्ये माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी, नायब तहसीलदार जयश्री पंचे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष हुंबे, गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, माध्यमिक विभागाचे अनिल जगताप तसेच विस्तार अधिकारी गुरुबाळ सणके यांचा समावेश होता. या समितीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप, कारकल, औज (मंद्रूप) आणि वडकबाळ येथील एकूण सहा शाळांची सविस्तर तपासणी केली.

तपासणीदरम्यान कारकल येथील जिल्हा परिषद शाळेतील दर्जेदार शिक्षण, संगणक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची शिस्त आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत समितीने कौतुक केले. मात्र, त्याच वेळी काही शाळांमध्ये लोंबकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारा, वर्गखोल्या व स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि शालेय परिसरातील धोकादायक खड्डे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने दुरुस्ती व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश समितीने दिले. याशिवाय शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

एकाच शिक्षकावर शाळेचा गाडा

औज (मंद्रूप) येथील शाळेत एक शिक्षक महिन्याभरापासून रजेवर असल्याने संपूर्ण शाळेचे कामकाज एकाच शिक्षकावर सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पाहणीत समोर आले. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याने प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्याचे आदेश

वडकबाळ येथील शाळेत स्वयंपाकगृहाकडे जाणाऱ्या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी धोका निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले. यासोबतच मंद्रूप, औज आणि वडकबाळ येथील शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे कामकाज आणि तक्रार पेटीची प्रत्यक्ष अंमलबजावणी नियमांनुसार सुधारण्याचे निर्देश समितीने दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages