सोलापूर गणेश विसर्जन: अत्याधुनिक ड्रोनची नजर, ध्वनियंत्रणेवर बंदी अन् पोलिसांचा कडक पहारा
गणेशोत्सवाच्या सांगता विसर्जन मिरवणुका शांततेत, निर्विघ्न आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. शुक्रवारी ( २५ सप्टेंबर) निघणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकांवर 'एआय' ड्रोन तसेच सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
विसर्जन मार्गांवरील दोन हजारांहून अधिक खड्डे बुजवून रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले असून, एकूण तब्बल ४५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात यंदा १ हजार ५०० लहान आणि १ हजार ४८८ मोठ्या सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. बहुतांश प्रमुख मंडळांच्या मिरवणुका शुक्रवारी निघणार असल्याने महापालिकेने आठही विभागीय कार्यालयांतर्गत (झोन) नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गांवर अडथळा ठरणारे खड्डे डांबराचा वापर करून बुजवण्यात आले. त्याप्रमाणे मिरवणूकीस अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्यांची छाटणी, पथदिव्यांची दुरुस्ती आणि रात्रीच्या मिरवणुकीसाठी उच्च क्षमतेच्या 'फोकस लाइट'ची व्यवस्था करण्यात आली आहे.
आठ विसर्जन कुंड, २०० जीवरक्षक सज्ज…
शहरातील हिप्परगा तलाव, नीलम नगर ते सुनील नगर मार्ग, प्रिसिजन कारखान्याशेजारील म्हाडा विहीर, जुना विडी घरकुल, छत्रपती संभाजी महाराज तलाव (कंबर तलाव), राजसवनगर विहीर, गणपती घाट (दत्त चौक), विष्णू घाट (पासपोर्ट कार्यालयाजवळ) आणि जुनी लक्ष्मी विष्णू चाळ येथे विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तलावांतील गाळ उपसला असून, सुरक्षिततेचा उपाय म्हणून गणपती घाटावरील कारंजे तात्पुरते हटवले जाणार आहेत. प्रत्येक कुंडावर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि एकूण २०० हून अधिक प्रशिक्षित जीवरक्षक तैनात आहेत.
पोलिस बंदोबस्त, स्वतंत्र व कडक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोलापूर शहरात : ३ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, ९० सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १ हजार ३०२ पोलीस अंमलदार, ४३६ होमगार्ड आणि एसआरपीएफची एक कंपनी तैनात करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात : १२८ अधिकारी, १ हजार १०० होमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी, ३ आरसीपी पथके आणि ४ शीघ्र कृती दल सज्ज आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये 'एक गाव, एक गणपती' उपक्रम राबवण्यात आला असून अनेक मंडळांनी जागेवरच विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण पोलिसांवरील ताण हलका झाला आहे.
“विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यास पूर्ण बंदी असून मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” – अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
प्रमुख मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून डागडुजी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी कुंडांवर 'सीसीटीव्ही', प्रशिक्षित जीवरक्षक आणि आरोग्य निरीक्षकांची पथके सज्ज आहेत. नागरिकांनी सुरक्षित व पर्यावरणपूरक विसर्जनासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.” – विनायक कोण्ड्याल, महापौर, सोलापूर

No comments:
Post a Comment