आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय आरोग्य योजनांची माहिती मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद २०२६’ उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील पाणीवेश गणेश मंडळ येथे विविध शासकीय योजनांची माहिती देण्याचा उपक्रम घेण्यात आला.

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात गणेश उत्सवाच्या कालावधीत लोकसंवाद 2026 हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने आज सोलापूर शहरातील दत्त चौक येथील पाणीवेस सार्वजनिक गणेश मंडळ येथे हा उपक्रम पार पडला. 

यावेळी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे सहाय्यक समन्वयक शाम टांकसाळ यांनी नागरिकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाने या दोन्ही योजना एकत्रितपणे राबविल्या असून, पात्र कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचाराचा लाभ मिळतो. या योजनेत राज्यातील ४,५०० हून अधिक शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांचा समावेश असून, विविध गंभीर व दुर्धर आजारांवरील उपचारांचा लाभ घेता येतो.

योजनेअंतर्गत २,३९९ उपचारांचा समावेश असून, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, सांधे प्रत्यारोपण, बालरोग यांसह विविध महत्त्वाच्या आजारांवरील उपचारांचा समावेश आहे. हृदय, फुफ्फुस व यकृत प्रत्यारोपणासारख्या गंभीर उपचारांसाठीही शासनाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.

उपचार घेताना सामान्य वॉर्ड शुल्क, नोंदणी शुल्क, परिचारिका शुल्क, औषधे, रक्त, एक्स-रे, विविध वैद्यकीय तपासण्या, अतिदक्षता विभागाचा (ICU) खर्च, भोजन तसेच वाहतूक खर्च आदी बाबींचा योजनेत समावेश आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना उपचारासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी या योजनेचा लाभ दिला जातो.

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही अतिरिक्त लाभ
७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना अंतर्गत अतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत उपचार सहाय्य उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे पात्र ज्येष्ठ नागरिकांनाही गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक संरक्षण मिळू शकते.

आयुष्मान कार्डसाठी ऑनलाइन, ऑफलाइन सुविधा
आयुष्मान कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांनी Ayushman App किंवा beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर KYC प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच आपले सरकार सेवा केंद्र, आशा सेविका, स्वस्त धान्य दुकान चालक अथवा अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र यांच्या माध्यमातूनही कार्ड काढण्यासाठी मदत घेता येते.

यावेळी शाम टांकसाळ यांनी जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासनाच्या या आरोग्य संरक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. योजनांबाबतच्या तक्रारींसाठी १५५३८८ / १८००२३३२२०० हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत.

प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी प्रास्ताविक केले. यात माहिती जनसंपर्क विभागाने दिनांक 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत लोकसंवाद 2026 उपक्रम सुरू  केल्याची माहिती देऊन या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील मानाचे गणपती, मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी येणाऱ्या भाविक, नागरिक यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्या योजना विषयी जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ही राज्यातील गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा चे दस्तावेजीकरण करण्यासाठी bappa.org यावर गणेश मंडळांनी त्यांच्या गणेश मंडळाची माहिती, फोटो, रील्स तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी ही त्यांच्या घरातील गणपती चे फोटो, रिल्स अपलोड करण्याबाबतचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे रमेश गायकवाड यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. तसेच माहिती कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले. यावेळी भाविक, नागरिक पाणीवेश गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages