शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस प्रारंभ

 

शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक पदभरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीस प्रारंभ

आदिवासी विकास विभागाकडून सविस्तर वेळापत्रक जाहीर



मुंबई(कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील गट-क (अराजपत्रित) पदांच्या भरती प्रक्रियेस गती देण्यात आली असून, पवित्र पोर्टलमार्फत शिफारस प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर सूचना व वेळापत्रक नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, निर्धारित वेळापत्रकानुसार कागदपत्र पडताळणी प्रक्रिया  ५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील एकूण २ हजार ४२१ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने शिक्षण आयुक्तालयाकडून मुलाखतीविना निवडीसाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील एकूण १ हजार ६०० उमेदवारांची यादी आदिवासी विकास विभागास प्राप्त झाली आहे.

यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातील ९२७, माध्यमिक शिक्षक संवर्गातील ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षक संवर्गातील २५२ उमेदवारांचा समावेश आहे. प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी पेसा क्षेत्रातील ४५९ तर नॉन-पेसा क्षेत्रातील १ हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसह अन्य आवश्यक मूळ कागदपत्रांची पडताळणी निर्धारित केंद्रांवर करण्यात येत आहे. विभागनिहाय पात्र उमेदवारांच्या संख्येमध्ये नाशिक विभागात सर्वाधिक ५८८ उमेदवारांचा समावेश असून, त्याखालोखाल ठाणे विभागात ४२४ उमेदवार, नागपूर विभागात २९६ उमेदवार तसेच अमरावती विभागात २९२ उमेदवार आहेत.

पडताळणी प्रक्रियेसाठी संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक असलेली सर्व मूळ प्रमाणपत्रे, जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच प्रत्येक कागदपत्राची एक साक्षांकित (स्वयंप्रमाणित) छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले आहे. उमेदवारांनी त्यांना निश्चित करून देण्यात आलेल्या दिनांक, वेळ व ठिकाणी उपस्थित राहावे. निर्धारित वेळेत अनुपस्थित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेसा क्षेत्रातील शिक्षक पदांसाठी प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या १९६, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १६, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ९४, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १५१ पदांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नॉन-पेसा क्षेत्रामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ५९३, प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या १२२, माध्यमिक शिक्षक मराठी माध्यमाच्या ३०२, माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या २३ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या १०१ पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली असून, या उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेनुसार उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंदर्भातील अद्ययावत सूचना व वेळापत्रकासाठी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages