गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

 गणेशोत्सवात डीजेला परवानगी नाही; ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा : अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदाही डीजेला परवानगी दिली जाणार नसून, नियमानुसार आवश्यक त्या ध्वनिक्षेपकांना परवानगी देण्यात येणार आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिला. कायदा सर्वांसाठी समान असून, गणेश मंडळांनी नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात गुरुवारी ‘श्री गणेशोत्सव सोहळा २०२६’ अंतर्गत शांतता समिती व गणेश मंडळांच्या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कबाडे बोलत होते.

या बैठकीस तहसीलदार विनायक मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे, वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, योगिनाथ बाजारमठ यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डीजेचालकांच्या उपजीविकेचा प्रश्न असला तरी ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सोलापूर शहरातील मागील अनुभव पाहता पारंपरिक मिरवणुकीतील ध्वनिव्यवस्थेचा गैरवापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अक्कलकोटमध्येही ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची जबाबदारी गणेश मंडळांनी घ्यावी, असे कबाडे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘एक बेस आणि एक टॉप’ अशा मर्यादित ध्वनिव्यवस्थेला परवानगी देण्याची मागणी केली. गणेशमूर्ती स्थापना व मिरवणुकीसाठी आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक असून, मंडळांनी मागणी केलेल्या मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतरच परवानगी दिली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. परवानगीची प्रक्रिया पोर्टलवर अर्ज अपलोड करून पूर्ण करता येणार असून, जुन्या मंडळांना तातडीने परवानगी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याच्या सूचना

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख मिरवणूक मार्गांची दोन दिवसांत पाहणी करून संयुक्त बैठक घ्यावी, तसेच मार्गातील अडथळे तातडीने दूर करावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विद्युत तारा व इतर अडथळे हटवावेत, रस्त्यांवरील खड्डे पाचव्या दिवसापर्यंत बुजवावेत आणि मिरवणूक मार्गावर पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सामाजिक उपक्रमांवर भर देण्याचे आवाहन

सध्या पाण्याची मोठी टंचाई असल्याने गणेश मंडळांनी वर्गणीतील काही निधी सामाजिक उपक्रमांसाठी वापरावा, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली. अक्कलकोट ही स्वामी समर्थांची पुण्यनगरी असल्याने येथील पारंपरिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.

भारत गल्ली परिसरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा कायम ठेवत सर्व उत्सवांना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी दिलीप सिद्धे, संजय देशमुख, अश्पाक बळोरगी, अविनाश मडिखांबे, चंद्रशेखर मडिखांबे, रुद्रय्या स्वामी, सूर्यकांत बिराजदार, संजय किणीकर, अल्ताफ पटेल आदींनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस नगरसेवक यशवंत धोंगडे, तम्मा शेळके, प्रवीण शहा, रमेश कापसे आदी उपस्थित होते.

छायाचित्र ओळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages