कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; नवीन इमारतीला मुहूर्त कधी? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 17, 2026

कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; नवीन इमारतीला मुहूर्त कधी?

 कामती प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक; नवीन इमारतीला मुहूर्त कधी?

दररोज १०० ते २०० रुग्णांचा वावर; स्लॅब कोसळण्याची भीती, प्रसूती विभागाचीही दुरवस्था






मोहोळ (कटूसत्य वृत्त):- ग्रामीण भागातील आरोग्यवर्धिनी म्हणून जिचा गाजावाजा सोलापूर जिल्ह्यात आहे तिच सध्या सलाईनवर आहे 

मोहोळ तालुक्यातील कामती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली असून, येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या आरोग्य केंद्रात दररोज सुमारे १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याने धोकादायक इमारतीचा वापर करणे रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे. इमारतीच्या छताचा स्लॅब जीर्ण झाल्याने तो कधीही कोसळण्याची भीती असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.


कामती प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. मात्र, आरोग्य केंद्राची इमारतच धोकादायक झाल्याने डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्णांनाही जीव मुठीत घेऊन येथे वावरावे लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः प्रसूती विभागाची अवस्था अत्यंत खराब असल्याची तक्रार आहे. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना अशा धोकादायक वातावरणात उपचार घ्यावे लागत असून, प्रसूतीनंतर महिलांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाची सुविधाही अपुरी आहे. तसेच पाण्याची उपलब्धता समाधानकारक नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.


आरोग्य केंद्राची सध्याची इमारत वापरण्यास अयोग्य असल्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. नवीन इमारतीची आवश्यकता असतानाही अद्याप बांधकामाला सुरुवात झालेली नाही. प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने रुग्णांना जुन्याच धोकादायक इमारतीत उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींचेही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यामुळे मोहोळचे आमदार राजू खरे नागरिकांच्या आरोग्याच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.


दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “कामती आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक झाली आहे. रुग्णाच्या अंगावर स्लॅब कोसळून दुर्घटना होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? नवीन इमारतीचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे तातडीने नवीन इमारतीचे काम सुरू करावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


दरम्यान, कामती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठीचा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला असून, नवीन इमारतीची आवश्यकता असल्याचे आरोग्य अधिकारी शांती बाबर यांनी सांगितले. पुढील मंजुरी व कार्यवाही शासनस्तरावर होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रस्ताव पाठवून दोन वर्षांचा कालावधी उलटूनही प्रत्यक्ष बांधकामाला मुहूर्त मिळत नसल्याने नवीन इमारतीसाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आणि दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages