माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद




मुंबई,(कटूसत्य वृत्त):-   शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने राज्यभर ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना थेट  देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शुक्रवारी परेल परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधावाटप उपनियंत्रक (परळ) माधुरी शिंदे, पुरवठा अधिकारी राजेंद्र पवार, आकाश निंबाळकर, सुनील कदम यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते. सुरुवातीला माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली.

‘वन नेशन वन रेशन’ची माहिती

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच शिधावाटप विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. शिधापत्रिकाधारकांसाठी उपलब्ध असलेल्या योजना, नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसीचे महत्त्व तसेच ऑनलाइन सुविधांची माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्याचा लाभ दिला जातो. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य वितरित केले जाते. तसेच ‘वन नेशन वन रेशन’ सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानातून शिधाजिन्नस घेता येतात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.


ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या सदस्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने अधिकृत शिधावाटप दुकानात जाऊन ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

शिधापत्रिकेतील सदस्यांचे मोबाइल सिंडिंग करण्याचे काम सुरू असून, ऑनलाइन रेशन कार्ड सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. शिधावाटपाशी संबंधित तक्रारींसाठी शिधापत्रिकेवर टोल फ्री क्रमांक नमूद करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.

नवीन शिधापत्रिकेसाठी कागदपत्रांची माहिती

नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वीच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला तसेच रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना देण्यात आली. भाडेपावती, एलपीजी जोडणी, बँक पासबुक, वीज देयक, वाहनचालक परवाना, आधार कार्ड आदींपैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रत्यक्ष जागेची पडताळणी केल्यानंतरच नवीन शिधापत्रिका देण्यात येते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन सुविधांचे मार्गदर्शन

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन सुविधांचा वापर, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध डिजिटल सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी शिधापत्रिका आणि ऑनलाइन सेवांशी संबंधित त्यांच्या अडचणी मांडल्या. विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निराकरण करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत नागरिकांनी ‘आयुष्मान ॲप’च्या माध्यमातून आयुष्मान कार्ड काढून ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले.

परेल येथील नायगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, स्प्रिंग मिल कंपाऊंड परिसर, महादेव वाडी वागेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रभाग क्रमांक २०२, बालविकास मित्र मंडळ, शापूरजी पालनजी कंपाऊंड गणेशोत्सव मंडळ तसेच मुंबई मेदार (मुरुड) गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून हा लोकसंवाद उपक्रम राबविण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्याने त्याच ठिकाणी शासकीय योजनांची माहिती थेट पोहोचविण्याचा हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरत असून, त्यांच्या प्रश्नांना संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ मार्गदर्शन मिळत असल्याने ‘लोकसंवाद’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages