OPD मध्येच ५५ वर्षीय रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका; डॉक्टरांच्या तत्परतेने मिळाले जीवदान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील रेल्वेलाईन परिसरातील हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका ५५ वर्षीय रुग्णाला ओपीडीमध्येच अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याची घटना आज दुपारी घडली. रुग्णाच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने (Severe Chest Pain) ते उपचारासाठी आले होते. मात्र तपासणी सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली.
रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलमधील ओपीडी स्टाफने क्षणाचाही विलंब न करता आपत्कालीन उपचार सुरू केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही सेकंदांत CPR (Cardiopulmonary Resuscitation) सुरू करण्यात आले.
दरम्यान, हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर शैलेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णाला तातडीने CPR दिले. त्यानंतर आवश्यकतेनुसार DC (Direct Current) शॉक/डिफिब्रिलेशन देत पुढील आपत्कालीन उपचार करण्यात आले. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाला वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले.
*काही सेकंदांची तत्परता ठरली जीवदान देणारी*
हृदयविकाराच्या तीव्र झटक्याच्या वेळी सुरुवातीचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत रुग्णाला तातडीने CPR देणे आणि आवश्यक असल्यास डिफिब्रिलेशनसह पुढील आपत्कालीन उपचार करणे महत्त्वाचे ठरते. या घटनेतही रुग्णाला वेळ न दवडता उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळू शकले.
या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज हॉस्पिटलमध्ये कैद झाले आहे. या फुटेजमध्ये रुग्णाची अचानक बिघडलेली प्रकृती, त्यानंतर हॉस्पिटल स्टाफकडून तातडीने सुरू करण्यात आलेले CPR आणि डॉक्टरांकडून करण्यात आलेले आपत्कालीन उपचार दिसून येत आहेत.
हृदयविकाराचा झटका कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी येऊ शकतो. अशावेळी रुग्णाला तातडीने योग्य प्रथमोपचार व वैद्यकीय उपचार मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. CPRचे प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी केलेली कृती अनेकदा रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी निर्णायक ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले.
हृदयम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर शैलेश पाटील तसेच ओपीडी स्टाफने दाखविलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेचे कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment