केम मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; प्रहारचे संदीप तळेकर यांचे तहसीलदारांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

केम मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; प्रहारचे संदीप तळेकर यांचे तहसीलदारांना निवेदन

केम मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी; प्रहारचे संदीप तळेकर यांचे तहसीलदारांना निवेदन




 करमाळा (कटूसत्य वृत्त):-  करमाळा तालुक्यातील केम मंडळातील कार्यरत मंडळ अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याचा आरोप करत संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची तातडीने बदली करून नवीन मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, केम मंडळांतर्गत आठ गावे असून महसूल विभागाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मंडळ कार्यालयाशी सातत्याने संपर्क साधावा लागतो. मात्र, संबंधित मंडळ अधिकारी कार्यालयात नियमित उपस्थित राहत नसल्याने अनेक वेळा नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
यामुळे फेरफार नोंदी, वारस नोंदी, उत्पन्न व रहिवासी दाखले, जमिनीशी संबंधित कामे, पंचनामे तसेच इतर महसुली कामांमध्ये अनावश्यक विलंब होत असून नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच केवळ केम गावातीलच नव्हे, तर मंडळातील इतर गावांतील नागरिकांकडूनही संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची, प्रलंबित कामांची व नागरिकांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी. तसेच आवश्यक वाटल्यास संबंधित अधिकाऱ्यांची नियमानुसार तातडीने बदली करून केम मंडळासाठी नवीन मंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, करमाळा तसेच जिल्हाधिकारी, सोलापूर यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ग्रामसभेचा सर्वानुमते ठराव आणि नागरिकांच्या सातत्याने होत असलेल्या तक्रारी लक्षात घेता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे केम मंडळातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, या विषयावर केम ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही संबंधित मंडळ अधिकाऱ्यांच्या बदलीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून, त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages