सोलापूरात सपकाळ यांच्या प्रतिमेस बांगड्यांचा हार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

सोलापूरात सपकाळ यांच्या प्रतिमेस बांगड्यांचा हार

सोलापूरात सपकाळ यांच्या प्रतिमेस बांगड्यांचा हार
 राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या "गुंगी गुडिया" या वक्तव्याचे तीव्र पडसाद सोलापूरमध्ये उमटले. या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यालयासमोर एकत्र येत संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान "हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध असो!", "सुनेत्रा पवार जिंदाबाद!", "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद!" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला. आंदोलनाची तीव्रता आणि मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांमुळे काही काळ काँग्रेस कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राजकीय मतभेद आणि वैचारिक विरोध असू शकतो; मात्र कोणत्याही महिला नेत्याबाबत बोलताना राजकीय पक्षांनी योग्य भाषेचा आणि मर्यादांचा वापर केला पाहिजे. राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासारख्या जबाबदारीच्या पदावर कार्यरत असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत अशा प्रकारचे वक्तव्य करणे निषेधार्ह असल्याची भूमिका आंदोलकांनी मांडली.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या सन्मानाचा अवमान करणारी कोणतीही भाषा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहन करणार नाहीत. राजकीय टीका जरूर करावी; मात्र ती वैचारिक आणि सभ्य भाषेत असावी. राजकीय टीकेच्या नावाखाली महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे योग्य नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
तसेच संबंधित वक्तव्याबद्दल जाहीरपणे माफी मागण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यापुढेही सुनेत्रा  पवार यांच्याबाबत अपमानास्पद किंवा अवमानकारक वक्तव्य करण्यात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तोफिक शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष रियाज शेख, उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष सुवर्णा झाडे, जिल्हा उपाध्यक्ष नागेश पवार, सौदागर बाबर, जितेंद्र शिलवंत, रसैफुभाई मनियार, अर्फाद सय्यद, जुनेद दर्जी, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप ननवरे, उत्तर सोलापूर तालुका युवक अध्यक्ष नंदकुमार गरड, तसेच प्रवीण चाफा करंडे, बशीर शेख, आसिफ राजे, आखिल नाईकवाडी, बुडन नदाफ, हेमंत चौधरी, बंडू मस्के, सुनील चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या "गुंगी गुडिया" या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक भूमिका घेत थेट सोलापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन केल्याने या आंदोलनाची शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages