व्हाट्सॲप स्टेटसमुळे ५ वर्षांची हरवलेली चिमुकली आईच्या कुशीत सुखरूप! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

व्हाट्सॲप स्टेटसमुळे ५ वर्षांची हरवलेली चिमुकली आईच्या कुशीत सुखरूप!

 व्हाट्सॲप स्टेटसमुळे ५ वर्षांची हरवलेली चिमुकली आईच्या कुशीत सुखरूप!




मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. मात्र, याच सोशल मीडियाचा योग्य आणि प्रभावी वापर केला, तर कठीण प्रसंगातही नागरिकांना कसा दिलासा मिळू शकतो, याचा प्रत्यय बुधवारी मोहोळ शहरात आला. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी सिद्धेश्वर बाबर यांच्या तत्परतेमुळे व एका व्हाट्सॲप स्टेटसमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हरवलेली अवघ्या पाच वर्षांची चिमुकली काही तासांतच तिच्या आईला सुखरूप मिळवून देण्यात यश आले आहे.

त्याचे झाले असे की बुधवारी नेहमीप्रमाणे मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियंत्रणाचे आणि सुरक्षेचे काम सुरू असताना एक पाच वर्षांची चिमुकली संभ्रमावस्थेत आणि घाबरलेल्या स्थितीत एकटीच फिरताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. मोहोळ वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सिद्धेश्वर बाबर यांनी तातडीने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला सुरक्षितपणे पोलीस चौकीत आणले.

पोलीस चौकीत आणल्यानंतर चिमुकली खूप घाबरलेली होती. पोलीस निरीक्षक दीपक पाटील आणि पो. कॉ. सिद्धेश्वर बाबर यांनी सर्वप्रथम तिला खाऊ देऊन तिचा भीतीयुक्त ताण दूर केला आणि अत्यंत आपुलकीने तिची विचारपूस केली. ती लहान असल्याने तिला स्वतःच्या घराचा पत्ता किंवा पालकांचा मोबाईल नंबर सांगता येत नव्हता.


चिमुकलीच्या पालकांचा शोध घेणे हे मोठे आव्हान होते. अशा वेळी पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर बाबर यांनी एक नामी युक्ती वापरली. त्यांनी तात्काळ त्या चिमुकलीचा फोटो काढून आपल्या मोबाईलवर एका आवाहनासह 'व्हाट्सॲप स्टेटस' ठेवले. या स्टेटसच्या माध्यमातून पोलीस आणि स्थानिक नागरिकांचे विविध व्हॉट्सॲप ग्रुप्स, डिजिटल नेटवर्क यामध्ये हा फोटो वाऱ्याच्या वेगाने पसरला.

सोशल मीडियावर हे स्टेटस वेगाने व्हायरल झाल्यामुळे काही वेळात ही माहिती त्या चिमुकल्या मुलीच्या पालकांपर्यंत पोहोचली. आपली मुलगी सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात असल्याचे समजताच तिची आई धावतच पोलीस चौकीत पोहोचली. आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप पाहून आईला अश्रू अनावर झाले. पोलिसांनी योग्य ती खात्री करून चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले.
पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सिद्धेश्वर बाबर यांनी दाखवलेली समयसूचकता, संवेदनशीलता आणि कर्तव्यभावनेचे संपूर्ण मोहोळ शहर व तालुक्यातून भरभरून कौतुक केले जात आहे. "पोलीस हेच जनतेचे खरे मित्र असतात" याची प्रचीती या घटनेतून पुन्हा एकदा आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages