‘बीओटी’च्या नावाखाली महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर डल्ला?विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचे नऊ आरक्षित भूखंड 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर विकसित करण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पेटला आहे.
या भूखंडांची मालकी पालिकेकडेच कायम राहणार असून मूळ आरक्षण अबाधित ठेवूनच शासकीय नियमांनुसार विकास केला जात असल्याचा निर्वाळा महापौर विनायक कोंड्याल यांनी दिला आहे. तर, दुसरीकडे, पालिकेच्या महत्वाच्या जागा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा हा डाव असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने महापालिका मुख्यालयात तीव्र निदर्शने केली.
महानगरपालिकेच्या मंगळवारी (दि. १८) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून ७ आणि महापौरांनी सुचवलेल्या २ अशा एकूण ९ जागांचा बीओटी प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. याविरोधात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), माकप, आप आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) दुपारी महापालिका मुख्यालयात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. पाणीपुरवठा योजनेतील सुमारे १५० कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शाळा व उद्यानांच्या जागांचे खासगीकरण करणे चुकीचे असल्याचा आक्षेप आघाडीने घेतला. सत्ताधारी विकासनिधी आणण्यात अपयशी ठरल्यानेच हे भूखंड बिल्डरांच्या हवाली केले जात असल्याचा घणाघात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केला. हा प्रस्ताव मागे न घेतल्यास सर्वसाधारण सभा बंद पाडण्याचा, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात आंदोलन करण्याचा आणि थेट न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
भाजपची पश्चिम विभागीय बैठक गुरुवारी (२० ऑगस्ट) सोलापुरात होत असून, त्यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह वरिष्ठ नेते सोलापुरात येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी रान उठवले आहे. महापालिकेत संख्याबळ नगण्य असतानाही विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला जेरीस आणले असून, सत्ताधारी पक्षांतर्गत गटबाजीत गुरफटल्याची चर्चा आहे.
पहिल्या टप्प्यात दोनच जागा; ७० कोटींचे उत्पन्न : महापौर
शासनाच्या जुलै २०२६ च्या आदेशानुसारच बीओटीचा निर्णय घेण्यात आला असून, पालिकेचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात सातरस्ता येथील बस डेपो आणि गोल्डफिंच पेठेतील जुना बैल गोठा या दोनच जागा विकसित केल्या जातील; ज्यातून सुमारे ७० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. विरोधकांनी सत्तेत असताना अनेक जागा बीओटीवर दिल्या आहेत. काही मोकळ्या जागा लाटल्या; अशा मोक्याच्या जागांची यादी प्रशासनामार्फत तयार करून सोलापूरकरांसमोर आणली जाईल, असे सांगत विरोधकांचे लक्ष विकासापेक्षा स्टंटबाजीवरच अधिक असल्याचा टोला महापौरांनी लगावला.

No comments:
Post a Comment