कर्कश सायलेन्सर लावणाऱ्या ११ बुलेटस्वारांवर टेंभुर्णी पोलिसांची धडक कारवाई
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहर व परिसरात कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून बुलेटसह दुचाकी वाहने चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात टेंभुर्णी पोलिसांनी धडक मोहीम राबविली. या कारवाईत कर्कश सायलेन्सर नसलेल्या ११ बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
टेंभुर्णी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकी वाहनांमुळे नागरिक त्रस्त झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पांडेकर, सहायक पोलीस फौजदार हनुमंत झिंगे, पोलीस हवालदार विशाल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रहिम मुलाणी व रशीद मुलाणी यांच्या पथकाने टेंभुर्णी चौक, कुर्डुवाडी चौक, अकलूज चौक तसेच बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग व नाकाबंदी केली.
तपासणीदरम्यान कर्कश आवाज करणारे सायलेन्सर लावलेल्या ११ बुलेट आढळून आल्या. पोलिसांनी या वाहनांना ताब्यात घेत फिटरच्या मदतीने कर्कश सायलेन्सर काढून टाकले.
याशिवाय बिगर नंबर प्लेट, काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट आदी नियमबाह्य बाबी आढळलेल्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ६ लाख ९४ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कारवाईनंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे तसेच कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरू नयेत, असे आवाहन केले.
टेंभुर्णी शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments:
Post a Comment