अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्याचा स्लॅब कोसळला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 12, 2026

अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्याचा स्लॅब कोसळला

 अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वरांड्याचा स्लॅब कोसळला

 १३ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्यातील अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेत मंगळवारी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या वरांड्याचे कॉंक्रीटचे छत (स्लॅब) अचानक कोसळले.

या दुर्घटनेत १३ विद्यार्थी आणि २ शिक्षक जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बबलाद येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची कन्नड माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. २५० पेक्षा अधिक विद्यार्थी या शाळेत शिकतात. मंगळवारी सकाळी शाळेची सकाळची प्रार्थना पार पडली. प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थी रांगेने आपापल्या वर्गाच्या दिशेने जात होते. त्याच वेळी वरांड्यातील कॉंक्रीटच्या छताचा मोठा भाग अचानक खाली कोसळला. थेट विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या अंगावर ढिगारा पडल्याने शाळेच्या आवारात एकच घबराट आणि धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित शिक्षकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना बाहेर काढले.

त्यामध्ये रमेश शिवमूर्ती व भीमण्णा गवळी हे दोन शिक्षक व १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ४ विद्यार्थ्यांच्या डोक्याला खोच पडली. तर, दोघांच्या कपाळाला खोच पडली आहे. जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जखमी विद्यार्थी व शिक्षकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृतीस्थिर असून मलमपट्टी, औषधोपचार करून विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी दिली.

शाळांच्या सुरक्षेचा आणि निकृष्ट बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर

या दुर्घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतींची दुरवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जुन्या आणि धोकादायक इमारतींचे वेळेत ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ व दुरुस्ती का केली जात नाही, असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची तात्काळ सुरक्षा तपासणी करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

अक्कलकोट तालुक्यात एकूण २३५ शाळांमधील १२८ वर्गखोल्या धोकादायक आहेत. त्यामध्ये यावर्गखोलीचा समावेश नाही. शिक्षक-मुख्याध्याकांच्या नियमीत बदली होतात, त्यामुळे दुर्घटना घडलेल्या शाळेची इमारत नेमकी कधी बांधली होती, याबाबतची माहिती शाळेच्या सध्याच्या मुख्याध्यापककडे नाही. दुर्घटना घडलेल्य शाळेची ती इमारत प्रत्यक्षदर्शी सुस्थितीत दिसत असली तरी प्रत्यक्षात अंतर्गत नादुरुस्ती हे स्ट्रक्चरल आँडीटमध्ये समोर येईल.- प्रशांत अरबाळे, गटशिक्षणाधिकारी, अक्कलकोट

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages