सोलापूर जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या रचनेत बदल होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या रचनेत लवकरच बदल होण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात काही मतदान केंद्रांवरील मतदारसंख्येत बदल होणार असून, मतदारांच्या सोयीचा विचार करून केंद्रांची पुनर्रचना केली जाणार आहे.
देशभरात राबविण्यात आलेल्या एसआयआर मोहिमेदरम्यान सोलापूर जिल्ह्यात सुमारे ६ लाख १३ हजार मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये दुबार नावे, मृत मतदार, स्थलांतरित मतदार तसेच नमूद केलेल्या पत्त्यावर न आढळलेल्या मतदारांचा समावेश आहे. मात्र, पत्त्यावर न आढळलेल्या काही मतदारांनी आवश्यक पुरावे सादर केल्यास त्यांचा पुन्हा मतदार यादीत समावेश होऊ शकतो.
या प्रक्रियेनंतर मतदारसंख्येचा आढावा घेऊन मतदान केंद्रांची रचना केली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ७२७ मतदान केंद्रे आहेत. या संख्येत फारसा बदल होण्याची शक्यता नसली तरी प्रत्येक बूथवरील मतदारसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे.
एका गावात दोन मतदान केंद्रे असल्यास दोन्ही केंद्रांवर शक्यतो समान संख्येने मतदार राहतील, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. तसेच एखाद्या वाडी-वस्तीवरील मतदारांना मतदानासाठी दूर जावे लागू नये, यासाठी मतदारसंख्या कमी असली तरी संबंधित ठिकाणी मतदान केंद्र कायम ठेवण्याचा विचार केला जाणार आहे.
या सुसूत्रीकरणामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा वेळ वाचण्यास मदत होईल. मतदान केंद्रांवरील अनावश्यक गर्दी आणि रांगा कमी होतील. तसेच प्रशासनालाही निवडणूक प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पार पाडता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात बदललेल्या मतदान केंद्रांच्या रचनेकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
यादीत नाव नसल्यास काय कराल?
मतदार यादीत नाव नसणे, नाव किंवा वय चुकीचे असणे, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. प्रारूप यादीत नाव न आल्यास अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी संबंधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी केले आहे. आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करून पात्र मतदारांना नाव समाविष्ट करण्याची संधी मिळू शकते.
No comments:
Post a Comment