दीड हजार कोटींच्या पाणीपुरवठा योजनेची ऑगस्टअखेर निविदा
शासनाच्या ‘मित्रा’कडे निविदा सादर; जागतिक बँकेच्या मान्यतेनंतर प्रक्रिया वेगाने होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या सुमारे १,५०० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाची निविदा महापालिका प्रशासनाने तयार करून शासनाच्या ‘मित्रा’कडे सादर केली असून, जागतिक बँकेच्या मान्यतेनंतर ऑगस्टअखेर निविदा प्रसिद्ध करण्याची तयारी सुरू आहे.
निविदेला आवश्यक मान्यता मिळविण्यासाठी महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. ‘मित्रा’मार्फत निविदेत आवश्यक बदल करून ती जागतिक बँकेकडे सादर केली जाणार आहे. पुढील दोन दिवसांत जागतिक बँकेची मान्यता मिळण्याची अपेक्षा असून, त्यानंतर ऑगस्टअखेर निविदा काढण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून ऑक्टोबरमध्ये मक्तेदार निश्चित करून वर्क ऑर्डर देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र शहरातील अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिकेकडून हा नवीन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या १,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या हमीवर जागतिक बँकेकडून ७०० कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तसेच अर्बन चॅलेंज फंडमधून ३५० कोटी रुपये उपलब्ध होणार असून, उर्वरित ३५० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला उभारावा लागणार आहे.
जागतिक बँकेच्या निर्देशानुसार संपूर्ण निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने निविदा तयार करून ‘मित्रा’कडे सादर केली होती. आता त्यात आवश्यक बदल करून ती जागतिक बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
शहरांतर्गत १,१५० किलोमीटर पाइपलाइन
या प्रकल्पांतर्गत सोलापूर शहरात तब्बल १,१५० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. शहराच्या हद्दवाढ भागातील सुमारे ९० टक्के क्षेत्रात पाणीपुरवठा यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. याशिवाय पाण्याच्या टाक्यांपासून विविध व्यासाच्या सुमारे २५० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यात येणार आहेत.
प्रकल्पात ३० उंचावरील पाण्याच्या टाक्या, १० एमबीआर टाक्या आणि जलशुद्धीकरण केंद्रे (WTP) उभारण्यात येणार आहेत. तसेच शहरातील तब्बल २ लाख ३८ हजार घरांना पाणी मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment