पाणंद रस्त्यांच्या कामांना मिळणार गती; आ. अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
माढा (कटूसत्य वृत्त) : माढा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी पाणंद रस्ता कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑगस्ट रोजी माढा तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. प्रलंबित कामांतील अडचणी तातडीने दूर करून रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस पाणंद रस्ता कमिटीच्या सचिव तथा प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भरणे, माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे, वन अधिकारी योगेश घोडके, उपमोजणी अधिकारी अतुल साळवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मेटकरी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आनंद नाझरे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, शिवाजी पाटील, नितीन कापसे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी बालाजी पाटील, शिवाजी सुर्वे, आनंद कानडे आदी उपस्थित होते.
यावेळी माढा विधानसभा मतदारसंघातील विविध पाणंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रस्त्यांना मंजुरी देण्यापासून प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीपर्यंत येणाऱ्या अडचणी, शेतरस्त्यांवरील अडथळे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये आवश्यक असलेला समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना वर्षभर शेतात जाण्या-येण्यासाठी तसेच शेतमालाची वाहतूक सुलभ होण्यासाठी सुस्थितीत पाणंद रस्ते उपलब्ध असणे आवश्यक आहे. गावांची शेतरस्त्यांशी प्रभावी जोडणी झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाच्या समन्वयाने प्रलंबित कामे मार्गी लावून दर्जेदार पाणंद रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करून रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रलंबित अडचणी तातडीने सोडवून पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
No comments:
Post a Comment