वैराग तालुक्यासाठी शिवसेना प्रवेशाची पुनरावृत्ती; उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर शिंदेंच्या उपस्थितीत करणार पक्षप्रवेश
वैराग (कटूसत्य वृत्तसेवा) : वैराग तालुका निर्मिती, अप्पर तहसील कार्यालय तसेच वैराग परिसराच्या विकासाच्या मागण्यांसाठी वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भुमकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती भुमकर यांनी दिली.
वैराग तालुका निर्मिती आणि वैराग परिसराला उजनीचे पाणी मिळावे, या मागण्यांसाठी यापूर्वी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार कै. चंद्रकांत निंबाळकर यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आणि सत्तेच्या उलथापालथीमुळे वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न प्रलंबित राहिला.
निरंजन भुमकर यांनी त्यांचे आजोबा धन्यकुमार भुमकर यांच्या काँग्रेस विचारधारेचा वारसा मनात ठेवून राजकारणाला सुरुवात केली. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वैराग परिसरातील धुरा सांभाळली. या काळात त्यांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य यांसह विविध पदांवर काम केले. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून बार्शी विधानसभा निवडणूक लढवली; मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
त्यानंतर वैराग नगरपरिषद निवडणुकीत भुमकर यांनी १३ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता स्थापन केली आणि उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा स्थानिक विकासकामांवर परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
वैराग तालुका निर्मिती, अप्पर तहसील कार्यालय आणि बंद असलेला संतनाथ साखर कारखाना सुरू करण्याचा प्रश्न या वैरागकरांच्या प्रमुख मागण्या आहेत. या प्रश्नांना गती देण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे निरंजन भुमकर यांनी स्पष्ट केले.
वैरागच्या विकासासाठी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला असून, आगामी काळात तालुका निर्मितीसह परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही भुमकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment