सोलापूर शहराबाहेरून तिसरी-चौथी रेल्वेलाईन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

सोलापूर शहराबाहेरून तिसरी-चौथी रेल्वेलाईन

 सोलापूर शहराबाहेरून तिसरी-चौथी रेल्वेलाईन

 ५३० एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पुणे-सोलापूर-वाडी दरम्यानच्या ३९४.११ किलोमीटर रेल्वेमार्गावरील वाढता वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सोलापूर शहराबाहेरून सोरेगावमार्गे तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन उभारण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

या नव्या रेल्वेमार्गासाठी सहा तालुक्यांतील जवळपास ५३० एकर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सध्या सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून दोन रेल्वेमार्ग जातात. या मार्गावर प्रवासी गाड्यांसोबत मोठ्या प्रमाणात मालगाड्यांचीही वाहतूक होते. त्यातच प्रवासी गाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वे वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे.

अनेकदा प्रवासी गाड्यांना सिग्नलवर थांबावे लागत असल्याने त्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयाने शहराबाहेरून स्वतंत्र तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सोरेगावमार्गे प्रस्तावित बाह्य रेल्वेमार्गामुळे मालगाड्यांची वाहतूक शहराच्या मध्यवर्ती भागातून वळविता येणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्याने सध्याच्या दोन रेल्वेमार्गांवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

त्यामुळे प्रवासी गाड्या अधिक सुरळीतपणे आणि वेळेत धावण्याची शक्यता असून, रेल्वे वाहतुकीची कार्यक्षमता वाढणार आहे.

प्रस्तावित तिसरी आणि चौथी रेल्वेलाईन पुणे-दौंड-कुर्डूवाडी-सोलापूर पुढे कलबुर्गी-वाडी या रेल्वेमार्गाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढण्यासोबतच भविष्यातील वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

शहराच्या बाह्य भागातून प्रस्तावित करण्यात आलेला हा रेल्वेमार्ग कवठे, डोणगाव, भाटेवाडी, नंदूर, सोरेगाव आणि कुमठे या परिसरांतून जाणार आहे. नव्या मार्गासाठी संबंधित भागातील जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या बाह्य रेल्वेमार्गाचा थेट फायदा सोलापूर शहरातील रेल्वे वाहतूक व्यवस्थेला होणार असून, बाळे आणि टिकेकरवाडी स्थानकांवरील प्रवासी वाहतूकही अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

नव्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेलाईनमुळे सोलापूरच्या रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढणार असून, भविष्यातील वाढती प्रवासी आणि मालवाहतूक हाताळण्यासाठी रेल्वेला अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages