मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 18, 2026

मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन

 मी कोणाच्या वाट्याला जात नाही, छेडाल तर उत्तर देईन

श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात पालकमंत्री गोरे यांची रोखठोक भूमिका





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू असून, विमानसेवा, टेक्सटाईल पार्क, आयटी पार्क, एमआयडीसी विस्तार, पायाभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जात आहे.  विकासाच्या प्रश्नांवर राजकारण न करता सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याची भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली.
           सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सत्कार व वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक मनीष केत, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे उपस्थित होते. प्रास्ताविक विक्रम खेलबुडे यांनी केले.
         पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री म्हणून १८ महिने पूर्ण झाले असून, समांतर जलवाहिनी, विमानसेवा, उड्डाणपूल, टेक्सटाईल पार्क यांसारखे अनेक प्रश्न पुढे आले. टेक्सटाईल पार्कचा प्रश्न मार्गी लागल्याने सुमारे १० हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. सोलापूरची गुंतवणूक वाढविण्यासाठी एमआयडीसीचा विस्तार, आयटी पार्क आणि वस्त्रोद्योगाला नव्या सवलती देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
          बोरामणी विमानतळाच्या प्रश्नावर बोलताना विद्यमान विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ८०० ते १ हजार कोटी, तर बोरामणीसाठी सुमारे ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. माळढोक पक्ष्याच्या अस्तित्वाबाबत वन विभागाचा अहवालही महत्त्वाचा ठरणार असून, विमानतळाबाबत सरकार तातडीने निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे ते म्हणाले.
        आदिला नदीच्या ब्लू व रेड लाईनच्या प्रश्नावर नागरिकांना दिलासा देताना, एकाही घरावर हातोडा पडू देणार नाही मात्र नव्याने बांधकाम करताना काळजी घ्यावी. नदी-नाल्याचा प्रश्न सोडवून शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.महापालिकेच्या सात जागा बीओटीवर विकसित करण्याच्या प्रस्तावाचे समर्थन करताना, निष्क्रिय जागांचा विकास करून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे.काम होण्याआधी ते कायदेशीर की बेकायदेशीर ठरविण्याचा अधिकार कोणाला? असा सवालही त्यांनी केला.
          प्रधानमंत्री आवास योजनेत महाराष्ट्रात एका वर्षात साडेपाच लाख घरे पूर्ण झाली असून, आता १५ लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे गोरे यांनी सांगितले. सोलापूरसह राज्यातील महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल उभारले जाणार असून, पहिल्या टप्प्यात १३ मॉलचे काम सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
        प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे
 सदस्य प्रमोद बोडके यांनी केले. आभार सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मानले.

विनाकारण छेडू नका, उत्तर
 द्यायलाही कमी पडणार नाही

स्वतःवरील आरोपांवर गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. आपल्यावर दाखल १८ गुन्ह्यांपैकी १५ प्रकरणांत निर्दोषत्व सिद्ध झाल्याचे सांगत, उर्वरित तीन प्रकरणांचा न्यायालयीन निकाल स्वीकारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी कोणाच्या वाट्याला जात नाही; मात्र विनाकारण छेडले तर उत्तर द्यायलाही कमी पडणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages