मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 14, 2026

मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा

मोडकळीस आलेल्या शाळा इमारतीच्या स्थलांतराचा मार्ग मोकळा
उच्च न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील बाळीवेस परिसरातील आदर्श विद्या मंदिर शाळेची मोडकळीस आलेली इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याने तिच्या तातडीच्या स्थलांतराचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना स्थलांतराबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत ॲड. विश्वासराव देवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

बाळीवेस येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत सन १९५२ पासून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या दोन शाळा जुन्या इमारतीमध्ये सुरू आहेत. सदर शाळेची इमारत मोडकळीस आलेली असून, ती शाळा चालविण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे महानगरपालिकेच्या स्तरावरून यापूर्वी नमूद करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून शाळा अन्यत्र स्थलांतरित करण्याचे मत महानगरपालिकेने व्यक्त केले होते.

या संदर्भात संबंधित शाळेच्या संस्थेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हा प्रस्ताव बराच काळ प्रलंबित राहिल्याने शाळेचे स्थलांतर होऊ शकले नव्हते. त्यामुळे संबंधित शाळेसाठी अन्यत्र उपलब्ध असलेल्या जागेवर स्थलांतराची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने शाळेच्या इमारतीची स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेतला. दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयासमोर हजर होते.

सुनावणीनंतर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठातील न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश एस. देशपांडे यांनी संबंधित प्रशासनाला शाळेच्या स्थलांतराबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या तसेच कार्यरत शिक्षकांच्या जीवितास कोणताही धोका किंवा हानी होणार नाही, याची दक्षता घेण्याची ग्वाही प्रशासनाकडून न्यायालयाला देण्यात आली.

न्यायालयाच्या निर्देशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत मोडकळीस आलेल्या इमारतीत सुरू असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शाळा स्थलांतराच्या प्रश्नाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील शाळेच्या इमारतीचा काही भाग कोसळून १३ विद्यार्थी व दोन शिक्षक जखमी झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक अधोरेखित झाले आहे. शाळांच्या धोकादायक इमारतींबाबत प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

आदर्श विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न न्यायालयीन पातळीवर मांडून त्यासाठी तातडीने कार्यवाही होण्यास मार्ग मोकळा झाल्याने पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या प्रकरणात अॅडव्होकेट विश्वासराव देवकर आणि अॅडव्होकेट सौ. रंजना देवकर यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages