सोलापूर (कटूसत्य वृत्त): होटगी रोडवरील काँक्रीटीकरणाच्या कामातील त्रुटी लक्षात घेऊन हे काम तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले असतानाही एमएसआयडीसीच्या कंत्राटदाराने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. बुधवारी आसरा चौकासह विविध ठिकाणी रस्त्याचे काम सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते इंगळगी-जेऊर रोडपर्यंत सुरू असलेल्या काँक्रीटीकरणाच्या कामाबाबत सुरुवातीपासूनच अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. कामातील त्रुटी, वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत परिसरातील व्यापारी, नागरिक आणि भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप नोंदविला आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी संबंधित काम तात्पुरते थांबवून त्रुटींची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेचे अधिकारी आणि एमएसआयडीसीचे अधिकारी संयुक्तपणे कामाची पाहणी करणार असल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, या पाहणीपूर्वीच कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केल्याने आयुक्तांच्या आदेशालाच ठेंगा दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बुधवारी सायंकाळी आसरा चौक परिसरात कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिक आणि वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरम्यान, भाजपचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी या प्रकरणात रस्ते विभागप्रमुख प्रकाश गोंधळे आणि नगर अभियंता सारिका दिवाणजी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे विजयकुमार हत्तुरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी कामातील त्रुटींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे.
होटगी रोडवरील रस्ते काँक्रीटीकरणाचे काम गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सुरू असून, या कामामुळे परिसरातील अनेक नागरी सुविधा बाधित झाल्याचा आरोप होत आहे. या कामादरम्यान ८६ पैकी १६ चेंबर गाडले गेल्याचा, तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, बसवेश्वरनगर, शंकरनगर, शिवशाही, हत्तुरे वस्ती, मजरेवाडी आणि काजलनगर परिसरातील पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हवर काँक्रीट टाकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आता महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतरही काम सुरू राहिल्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment