सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी 'सक्षम सोलापूर' नागरी कृती मंचाचे नागरिकांना जाहीर आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 7, 2026

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी 'सक्षम सोलापूर' नागरी कृती मंचाचे नागरिकांना जाहीर आवाहन

 सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी 'सक्षम सोलापूर' नागरी कृती मंचाचे नागरिकांना जाहीर आवाहन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून परिवर्तन घडवावे, असे आवाहन 'सक्षम सोलापूर' नागरी कृती मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. सोलापूरच्या विकासासाठी कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, शहराच्या मूलभूत प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी पुढे यावे, असे मंचाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, एकेकाळी देशभर "गिरणगाव" म्हणून ओळख असलेल्या सोलापूरला आज खड्डेमय रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधांची कमतरता, रखडलेले विकास प्रकल्प आणि रोजगाराच्या मर्यादित संधी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील गुणवंत तरुणांना शिक्षण आणि रोजगारासाठी पुणे, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.

सोलापुरात आधुनिक आयटी पार्क, मोठे उद्योग, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागरिकांनी संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे मंचाने स्पष्ट केले आहे. "सक्षम सोलापूर" हा कोणत्याही राजकीय पक्षाचा मंच नसून, शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या प्रत्येक नागरिकाचा उपक्रम असल्याचेही आवाहनात नमूद करण्यात आले आहे.

मंचाने आपल्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये सोलापुरात आधुनिक आयटी पार्क व नवीन उद्योग उभारणे, विमानसेवा आणि वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, उड्डाणपूल व दर्जेदार रस्त्यांचे जाळे विकसित करणे, २४ तास पाणीपुरवठा, स्वच्छता व ड्रेनेज व्यवस्था सुधारणे, तसेच आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासोबतच 'व्हिजन २०३० – सक्षम सोलापूर' या संकल्पनेअंतर्गत नागरिकांच्या सहभागातून शहराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी, उद्योजक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या आणि विकासासंदर्भातील सूचना मंचापर्यंत पोहोचवाव्यात, तसेच लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी संवाद बैठकीत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

"आपण कोणाच्या विरोधासाठी नव्हे, तर सोलापूरच्या विकासासाठी एकत्र येत आहोत. जात, धर्म, भाषा आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून आधुनिक, स्वच्छ, रोजगारसमृद्ध आणि सक्षम सोलापूर घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा," असे मंचाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मंचाच्या वतीने नागरिकांना हा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले असून, संपर्क, नोंदणी व सूचना यासाठी ९५८८४९०२७४ हा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages