पंढरपुरात ‘साप्ताहिक अनंत विचार परिवार’तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- साप्ताहिक ‘अनंत विचार’ परिवारातर्फे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा गुरुवारी पंढरपूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगावकर महाराज यांनी भूषविले.
लेखन, क्रीडा, चित्रपट, सामाजिक सेवा, शिक्षण, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या विविध जाती-धर्मातील कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांच्या हस्ते सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ. जे. बी. शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही समाजाला प्रेरणा देणारी बाब असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक तसेच ‘अनंत विचार’ परिवाराशी संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना पुढील काळात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, असा सूर उपस्थितांमधून व्यक्त झाला.
या सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रम ‘साप्ताहिक अनंत विचार’ परिवाराने राबविला.
.png)
No comments:
Post a Comment