मोहोळ शहरात भाजपच्या वतीने भव्य तिरंगा रॅली
ना. राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा सहभाग
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत मोहोळ शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीची भावना वृद्धिंगत करून राष्ट्रीय अभिमान जागृत करण्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली उत्साहात पार पडली.
रॅलीच्या प्रारंभी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. बुधवार पेठ, आदर्श चौक, गवत्या मारुती चौक आणि मेन रोडमार्गे रॅली पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे मार्गस्थ झाली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना. राजन पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शक संकल्पनेतून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. या अभियानातून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होत असून राष्ट्रीय अभिमान जागृत करण्याचे कार्य सुरू आहे. मोहोळ शहर व तालुक्यात भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही तिरंगा रॅली देशभक्तीचे स्फुरण निर्माण करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी मोहोळचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे, उपाध्यक्ष सुरेश राऊत, प्रकाश चवरे, तालुकाध्यक्ष सतीश काळे, नगरसेवक मुश्ताक शेख, प्रमोद डोके, सुशिल क्षीरसागर, रुपेश धोत्रे, एजाज तलफदार, गुरुराज तागडे, अनिस कुरेशी, चंदन बरे, अंकुश अवताडे, सचिन चव्हाण, सुदर्शन कादे, राजू सुतार, संतोष धोत्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे रॅली उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
No comments:
Post a Comment