बोरामणी तिहेरी हत्याकांडात मुख्य आरोपीच्या पत्नी व दोन मुलांना जामीन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

बोरामणी तिहेरी हत्याकांडात मुख्य आरोपीच्या पत्नी व दोन मुलांना जामीन

 बोरामणी तिहेरी हत्याकांडात मुख्य आरोपीच्या पत्नी व दोन मुलांना जामीन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बोरामणी येथील शेतीच्या वादातून आणि पैशांच्या व्यवहारातून झालेल्या तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पप्पू मस्के याची पत्नी राणी शंकर मस्के (वय ४५), मुलगी दीक्षा शंकर मस्के (वय २२) आणि मुलगा नागेश ऊर्फ धीरज शंकर मस्के (वय २०) यांना सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जामीन मंजूर केला.

या प्रकरणात बोरामणी येथील गायत्री मस्के, तिची मुलगी प्रियांका आणि मुलगा शिवराज यांची तलवारीने गंभीर जखमी करून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या तिहेरी हत्याकांडात मुख्य आरोपी शंकर ऊर्फ पप्पू मस्के याच्यासह राणी, दीक्षा, धीरज तसेच सूरज माधव मोरे आणि सचिन शिवाजी वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गायत्री यांचे पती सुधाकर मस्के यांचे सुमारे पाच वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून गायत्री आणि तिचा दीर शंकर मस्के यांच्यात वाद सुरू होता. तसेच जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशांपैकी गायत्री यांनी शंकर यांना हातउसने दिलेले २५ लाख रुपये परत मागितल्यानेही दोघांमध्ये वाद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या पैशांवरून शंकर यांनी गायत्री यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर राणी, दीक्षा आणि धीरज यांनी अॅड. संतोष न्हावकर यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अॅड. रजपूत यांनी म्हणणे मांडले.
आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना अॅड. संतोष न्हावकर यांनी फिर्यादीतील आरोप आणि दोषारोपपत्रातील आरोपांमध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच आरोपींनी मुख्य आरोपीला मदत केल्याच्या आरोपांमध्येही फरक असून तपास पूर्ण झाल्याने आरोपींना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत राणी मस्के, दीक्षा मस्के आणि धीरज मस्के यांचा जामीन अर्ज मंजूर केला. यापूर्वीच आरोपी सूरज मोरे आणि सचिन वाघमारे यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आरोपींच्या वतीने अॅड. संतोष न्हावकर, अॅड. राहुल रूपनर, अॅड. मीरा पाटील, अॅड. सोहेल शेख आणि अॅड. शिवरत्न माने यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages