दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार महादेव जगताप यांचे दुःखद निधन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार महादेव जगताप यांचे दुःखद निधन

 दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार महादेव जगताप यांचे दुःखद निधन


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दैनिक केसरीचे ज्येष्ठ पत्रकार महादेव भागवत जगताप (वय ६८) यांचे गुरुवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने टेंभुर्णीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पत्रकारिता क्षेत्राने एक अनुभवी, अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार गमावला आहे.
महादेव जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले; मात्र गुरुवारी पहाटे अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
महादेव जगताप यांनी अनेक वर्षे दैनिक केसरीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न, सामाजिक विषय, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि जनसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. संयमी स्वभाव, वस्तुनिष्ठ लेखन आणि पत्रकारितेतील प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात आई पत्नी, दोन मुले दोन मुली असा परिवार आहे. ते पत्रकार अनिल जगताप यांचे थोरले बंधू होत.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. टेंभुर्णी येथील चव्हाणवाडी परिसरावर शोककळा पसरली असून, सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांच्यावर गुरुवारी सकाळी ११.५० वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages