सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, आडवे बोर घेण्याच्या शक्यतेची तांत्रिक तपासणी करा- अध्यक्ष दीपक वैद्य - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, आडवे बोर घेण्याच्या शक्यतेची तांत्रिक तपासणी करा- अध्यक्ष दीपक वैद्य

 सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, आडवे बोर घेण्याच्या शक्यतेची तांत्रिक तपासणी करा- अध्यक्ष दीपक वैद्य


सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील पाणीपुरवठा, जलसंधारण, पाणीटंचाई आणि स्वच्छता व्यवस्थेचा सविस्तर आढावा जिल्हा परिषद सोलापूरच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.
बैठकीस कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी, सदस्या गीतांजली साळुंखे, सदस्य नंदकुमार काळे, सदस्या क्षणमुखी कोरके, सदस्या वंदना कांबळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख आणि राज्य शासनाच्या संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सभेचे सचिव म्हणून कामकाज पाहिले.
बैठकीत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, जलसंधारणाची कामे, भूजल पातळी, पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि उपलब्ध जलसाठा यांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला.
कृषी विभागाकडील शेततळे योजना, शेततळ्यांची सद्यस्थिती आणि जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील प्रस्तावित, सुरू, पूर्ण आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, मनरेगा अंतर्गत जलसंधारणाची कामे यांची प्रगती तपासण्यात आली. उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करून जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा आणि पाणीटंचाईग्रस्त गावांची सद्यस्थिती याचीही माहिती घेण्यात आली. टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
सार्वजनिक विहिरींची तांत्रिक तपासणी
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून उपलब्ध जलस्रोतांचा अधिक प्रभावी वापर करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. जिल्ह्यातील सार्वजनिक विहिरींची प्रत्यक्ष पाहणी करून आडवे बोर घेणे शक्य आहे का आणि आवश्यकतेनुसार विहिरींचे खोलीकरण करता येईल का, याची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले.
विहिरींची खोली, उपलब्ध पाणीसाठा, जलधारण क्षमता तसेच खोलीकरण किंवा आडवे बोर घेतल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा अंदाज घेऊन सविस्तर तांत्रिक अहवाल तातडीने सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्वच्छता विभागाकडील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले. उपलब्ध पाण्याचा पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी गरजेनुसार प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.
सभेच्या शेवटी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून पाणीटंचाईचे पूर्वनियोजन, जलस्रोतांचे संवर्धन, अपूर्ण कामांची पूर्तता आणि पाणीपुरवठा योजनांना गती देण्याच्या सूचना अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिल्या. नागरिकांना पिण्याचे पाणी व स्वच्छतेच्या मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने नियमित आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages