सोलापूर जिल्ह्यात ३१३ वनगुन्हे उघडकीस; शिकार, वृक्षतोडीसह अतिक्रमणाचे प्रकार
वनक्षेत्रातील आगीच्या ४६ घटना; अवैध वाहतुकीच्या ५० प्रकरणांवर कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील वनसंपदा आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या, तरी वन्यजीवांची शिकार, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्राला आग तसेच वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणाच्या घटना सुरूच आहेत. गतवर्षभरात जिल्ह्यात विविध प्रकारच्या ३१३ घटना वन विभागाच्या निदर्शनास आल्या असून, संबंधित प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर साहित्य व मालमत्ता जप्त करण्यात आली. अवैध वाहतूक, विनापरवाना वृक्षतोड व वनसंपदेशी संबंधित वाहतुकीची प्रकरणे लक्षणीय आहेत. त्याचबरोबर वन्यजीवांच्या शिकारीची ६६ प्रकरणे उघडकीस आली. वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचेही ४२ प्रकार समोर आले आहेत.
वर्षभरातील कारवाईचा आढावा
| कारवाईचा प्रकार | वर्षभरातील घटना |
|---|---|
| अवैध वृक्षतोड | २६ |
| अवैध वाहतूक | ५० |
| आगीच्या घटना | ४६ |
| परवानगीविना चराई | १३ |
| वन्यजीव शिकार | ६६ |
| अतिक्रमण | ४२ |
| इतर घटना | ७० |
| एकूण | ३१३ |
घटना निदर्शनास येताच माहिती देण्याचे आवाहन
वन्यजीवांचे संरक्षण आणि वनसंपदा सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात वन्यप्राण्यांची शिकार, अवैध वृक्षतोड किंवा वनसंपदेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तसेच पर्यावरणप्रेमींनी तातडीने वन विभागाला माहिती द्यावी.
यासाठी १९२६ या २४ तास सुरू असलेल्या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment