सातारा, औंध गॅझेटियर लागू न केल्याने मराठा समाज आरक्षणापासून वंचित
मनोज जरांगे-पाटील यांची पंढरपुरात सरकारवर टीका; बावनकुळे यांच्या भूमिकेमुळे भाजप अडचणीत असल्याचा दावा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात मराठा समाजाच्या तब्बल ५८ लाख नोंदी सापडल्या असून, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ३ लाख नोंदी आढळल्या आहेत. या नोंदींच्या आधारे लाखो मराठा बांधव आरक्षणाच्या कक्षेत येऊ शकतात. मात्र, सातारा आणि औंध गॅझेटियर लागू न करता मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सधन दिसत असला, तरी भविष्यात या समाजासाठी सातारा आणि औंध गॅझेटियर अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर येथे रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे-पाटील यांनी महायुती सरकारसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेमुळे भाजप अडचणीत आला असून, सत्तेचा गैरवापर करून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही जरांगे-पाटील यांनी केला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ठोस भूमिका घेऊन आवश्यक त्या नोंदी आणि गॅझेटियरच्या आधारे समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment