अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाच्या प्रलंबित कामांना गती द्या
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जलसंपदा मंत्र्यांकडे विशेष बैठकीत मागणी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त): अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील सिंचनाच्या प्रलंबित कामांना गती देऊन शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली. त्यांच्या पुढाकाराने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत मतदारसंघातील सिंचनाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
उजनी डावा कालवा व त्याअंतर्गत येणाऱ्या शाखा कालव्यांच्या विशेष दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याबरोबरच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विविध मध्यम व लघु प्रकल्प तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी केली. तसेच संबंधित कामांसाठी विशेष सर्वेक्षण करण्याची मागणीही त्यांनी बैठकीत केली.
अनेक ठिकाणी कालवे आणि सिंचन यंत्रणेची दुरवस्था झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित पाण्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कालव्यांची दुरुस्ती, शाखा कालव्यांची कार्यक्षमता वाढविणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि पाणीसाठा वाढविणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
मंजूर कामे तातडीने सुरू करण्याची मागणी
अक्कलकोटसह दक्षिण सोलापूर भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून त्यासाठी निधीही उपलब्ध आहे, अशी कामे कोणत्याही विलंबाशिवाय प्रत्यक्ष सुरू करावीत, अशी आग्रही मागणी आमदार कल्याणशेट्टी यांनी केली.
मंजूर कामे केवळ कागदावर न राहता त्यांची जलद गतीने अंमलबजावणी व्हावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
कामे तात्काळ सुरू करा : विखे पाटील
बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेतली. प्रशासकीय मंजुरी आणि निधी उपलब्ध असलेल्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच प्रलंबित सिंचन विषयांवर आवश्यक कार्यवाही करून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात आली. या बैठकीमुळे अक्कलकोट तालुक्यातील सिंचनाच्या प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment