अण्णाभाऊंचे कर्तुत्व जागतिक दर्जाचे होते-डॉ. अजीज नदाफ
भारतरत्न किताबाचे अण्णाभाऊ हक्कदार! या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
लेखक किशोर जाधव लिखित "भारतरत्न किताबाचे अण्णाभाऊ हक्कदार! " या पुस्तकाचे प्रकाशन साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंचा सहवास लाभलेले सोलापूरचे ख्यातनाम शाहीर, विचारवंत, लेखक डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या आयोजक सावित्री महिला संघटनेच्या शकुंतला सूर्यवंशी, सुनिता गायकवाड, सुजाता फरतडे, प्रमिला जाधव, प्रा. आशा क्षीरसागर, स्मिता पाटील यांच्यासह कचरा वेचक महिलांसाठी कार्यरत असणारे बाळासाहेब रणदिवे, मिनेश बोराडे वैभव कसबे, हसिफ नदाफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुस्तकात मांडलेली भूमिका स्पष्ट करताना लेखक किशोर जाधव यांनी सांगितले की, "बहुजन समाजातून आणि कामगार वर्गातून “अण्णाभाऊंना भारतरत्न किताब दिला जावा! ” अशी मागणी मागील काही वर्षांपासून होत आहे. या मागणीचा भारतरत्न किताबाच्या निकषांवर विचार केला तर ही मागणी तथ्यपूर्ण असल्याचे स्पष्ट होते.भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न किताब दिला जातो, हा संकेत आहे.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगातील २७ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.अण्णा भाऊंनी विविध साहित्यप्रकार हाताळले – कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये, पदे, गीते… अशी विविध क्षेत्रे त्यांनी सहजगत्या पादाक्रांत केली. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचे योगदान शाहिरी, पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व चळवळीत लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्त्वपूर्ण आहे.आण्णा भाऊ १९३८ ते १९४४ या काळात ते गिरणगावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात, संघर्षात सामील होते. सन २०२० मध्ये साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील २०० पेक्षा आमदारांनी आणि ३० पेक्षा जास्त खासदारांनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळावा यासाठी शिफारस पत्रे पाठवली होती. वेळोवेळी अनेक आमदारांनी विधी मंडळात आणि खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेत अण्णाभाऊंना भारतरत्न किताब देण्यात यावा ही आग्रही मागणी केली आहे.जनभावना लक्षात घेऊन अण्णा भाऊंना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन सन्मानित करावे.
डॉ. अजीज नदाफ यांनी , " अण्णाभाऊंचे कर्तुत्व जागतिक दर्जाचे होते म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न किताब दिला गेला पाहिजे! स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात अण्णाभाऊंचे कार्य महत्त्वपूर्ण होते. अण्णाभाऊ खऱ्या अर्थाने मराठीचे पहिले दलित साहित्यिक आहेत.'पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलितांच्या तळहातावर तरली आहे,' असे त्यांनी सार्थपणे सांगितलेले होते. पण त्यांचा दलित अधिक व्यापक होता. ' शोषित श्रमजीवी,मग तो कोणीही असो दलित आहे असे त्यांचे मत होते.अण्णाभाऊ सारख्या मोठ्या लोककलावंता बरोबर काम करण्याचे भाग्य मला लाभले. आज वयाची नव्वदी पूर्ण केली तरी माझे विचार आणि दृष्टिकोन अजिबात बदललेला नाही." या शब्दात आपले विचार व्यक्त केले.
यावेळी सावित्री महिला संघटनेच्या वतीने डॉ. अजीज नदाफ यांचा सह पत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता फडतरे यांनी केले तर आभार प्रमिला जाधव यांनी मानले.

No comments:
Post a Comment