संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगावात १५० जणांचे रक्तदान
धनंजय मोरे मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम; सलग १३ वर्षांपासून रक्तदान शिबिराची परंपरा कायम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगाव (ता. माढा) येथे धनंजय मोरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत तब्बल १५० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी जीवनदायी योगदान दिले.
शुक्रवारी (दि. ३१ जुलै) ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन निमगाव (टें.)चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच भुजल सर्वेक्षण विभागाचे उपअभियंता आकाश डोके यांनी शिबिराला भेट देऊन आयोजक आणि रक्तदात्यांचे कौतुक केले.
या रक्तदान शिबिरात कुर्डूवाडी ब्लड बँकेच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले. युवक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून रक्तदान केले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते, हा सामाजिक संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
विशेष म्हणजे, माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कन्हेरगाव येथे सलग १३ वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या सातत्यपूर्ण सामाजिक उपक्रमामुळे परिसरात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण झाली असून युवकांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा वाढत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी धनंजय मोरे मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच रक्तदात्यांनी परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.

No comments:
Post a Comment