मराठा क्रांती मोर्चा आंदोलन प्रकरणी चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी न्यायालयात हजर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २०२१ मध्ये काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आक्रोश मोर्चाप्रकरणी चार विद्यमान आमदारांसह ३० आरोपी आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिंदे यांच्या न्यायालयात हजर झाले. या प्रकरणात एकूण ४८ आरोपी असून, त्यापैकी ३० जणांनी न्यायालयात हजेरी लावली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे आणि राजेंद्र राऊत, तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि माजी खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
दि. ४ जुलै २०२१ रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेने या मोर्चाला परवानगी नाकारली होती. असे असतानाही मोर्चाचे समन्वयक राम जाधव व किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप आहे.
या मोर्चात सहभागी झालेल्या आमदारांसह इतरांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
या खटल्याचे समन्स आरोपींना प्राप्त झाल्यानंतर आज आमदार विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान अवताडे, राजेंद्र राऊत यांच्यासह इतर आरोपी न्यायालयात हजर झाले.
आरोपींच्यावतीने ॲड. संतोष न्हावकर, ॲड. सचिन साखरे, ॲड. राहुल रूपनर, ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. राज म्हात्रे आणि ॲड. अजिंक्य जाधव यांनी काम पाहिले. सरकारतर्फे ॲड. संतोष पाटील यांनी बाजू मांडली.

No comments:
Post a Comment