उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग कमी; कालच्या तुलनेत आज ६१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्क्यांवर; धरणात ३८,९०० क्युसेक्स पाण्याची आवक कायम
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात कालच्या तुलनेत घट करण्यात आली आहे. काल (१ ऑगस्ट) धरणातून ८१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता, तर आज (२ ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजेपर्यंत तो कमी करून ६१,६०० क्युसेक्स करण्यात आला आहे. धरणातील पाण्याची आवक घटल्याने जलसंपदा विभागाने विसर्गात कपात केली आहे.
रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी ४९६.६९० मीटर इतकी नोंदविण्यात आली. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९६.९२ टक्के असून एकूण पाणीसाठा ३२७३.२१ दशलक्ष घनमीटर (११५.५८ टीएमसी), तर उपयुक्त पाणीसाठा १४७०.४० दशलक्ष घनमीटर (५१.९२ टीएमसी) इतका आहे.
दौंड नदी मोजणी केंद्रावरून उजनी धरणात ३८,९०० क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात होणारी आवक लक्षात घेऊन जलसंपदा विभाग विसर्गाचे नियोजन करत आहे.
सध्या धरणाच्या सांडव्यावरून ६०,००० क्युसेक्स आणि वीजगृहातून १,६०० क्युसेक्स असा एकूण ६१,६०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय मुख्य कालव्यात २,६०० क्युसेक्स, बोगद्यातून ९०० क्युसेक्स, सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी २८० क्युसेक्स आणि दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी ९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.
विसर्गात घट झाली असली तरी भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह अद्याप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment