जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी कार्तिकेयन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 20, 2026

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी कार्तिकेयन

 जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी कार्तिकेय

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी “भटके विमुक्त समूह दाखला मेळावे” आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार सोलापूर जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी तालुका व मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात विमुक्त जाती व भटक्या जमातीतील एक ही पात्र नागरिक विविध प्रमाणपत्रे व शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ मिळवून देणे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयेन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. जगताप अन्य संबंधित विभागाचे विभाग प्रमुख तसेच अशासकीय सदस्य सुनील पवार, ऍड. निशांत परदेशी, संजय राठोड हे उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी  कार्तिकेयेन पुढे म्हणाले की,  ही 31 ऑगस्ट रोजी विमुक्त भटके दिन अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 28 29 व 30 सप्टेंबर च्या शिबिरापूर्वी 31 ऑगस्ट रोजी  तालुका व मंडळ स्तरावर विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी सर्व तहसीलदार यांनी शिबिरांचे आयोजन करावे व यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, आयुष्मान भारत कार्ड, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्रांची पूर्तता करून नागरिकांना त्वरित प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ द्यावा, असे त्यांनी सांगितले.
     प्रारंभी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांनी याच विभागाच्या सात ऑगस्ट 2026 रोजीच्या शासन निर्णयाची माहिती बैठकीत दिली. यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी संपूर्ण राज्यभरात एकाच वेळी दिनांक 28, 29 व 30 सप्टेंबर 2026 रोजी शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महसूल विभाग, संबंधित योजना विभाग व इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे मेळावे राज्यभरात एकाच दिवशी आयोजित केले जातील.या शिबिरांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार असून, स्थानिक अधिकारी, कर्मचारी व अशासकीय सदस्यांची उपस्थिती अनिवार्य असेल. मेळाव्याच्या १५ दिवस आधी लाभार्थ्यांची यादी निश्चित करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाईल. मेळाव्याच्या दिवशी अर्ज स्वीकारून त्याच ठिकाणी किंवा महिन्याच्या अखेरीस लाभ व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
     निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी जिल्ह्यात या पद्धतीने शिबिराचे आयोजन करण्याचे अनुषंगाने परिपत्रक काढून सर्व संबंधित तहसीलदार यांना सुचित केल्याचे सांगितले. यावेळी जिल्हास्तरीय समितीचे अशसकीय सदस्य सुनील पवार, निशांत परदेशी व संजय राठोड यांनी जिल्ह्यातील 34 वस्त्यांचे सर्वेक्षण करून 4 हजार लाभार्थ्यांना विविध दाखले आवश्यक असल्याची माहिती दिली. या दाखल्याचे वाटप 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिबिरामध्ये करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील लोकांसाठी कार्य करताना येणाऱ्या अडचणी तसेच प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीबाबतची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
    या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages