प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव ऑगस्ट अखेर पर्यंत सादर करावेत- जिल्हाधिकारी कार्तिकेयन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- जिल्हा नियोजन समिती अंतर्गत च्या सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गतचे प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव समितीकडे माहे ऑगस्ट 2026 अखेर पर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन 2024-25, 25- 26 मधील मंजूर कामांचा तसेच सन 2026- 27 च्या प्रशासकीय मान्यतेच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन आशिष लोकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला, संग्राम पवार यांच्या सह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन पुढे म्हणाले की, सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तांत्रिक मान्यता घेऊन 31 ऑगस्ट 2026 पर्यंत जिल्हा नियोजन समितीकडे प्रशासकीय मान्यता साठी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रस्ताव पाठवणे अनिवार्य आहे. यानंतर आलेल्या प्रस्तावा बाबत समितीकडून कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. तसेच त्या विभागाचा मंजूर निधी इतर विभागाला देण्यात येईल याची सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी नोंद घ्यावी. तसेच समितीकडून 30 सप्टेंबर 2026 अखेरपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर निधीच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय विभागाने दिलेल्या विहित मुदतीत मंजूर कामावर खर्च करणे अपेक्षित आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय तसेच मुख्य सचिव महोदय यांचे अत्यंत बारकाईने लक्ष आहे. याची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन सर्व विभागानी नियोजन समितीच्या कामामध्ये आर्थिक शिस्तीचे अत्यंत काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले.
सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर असलेल्या कामांमध्ये पुढील एक महिन्यात कार्यारंभ आदेश होऊ शकतील अशीच कामे संबंधित विभाग प्रमुखांनी सुरू करावेत अन्यथा संबंधित कामे रद्द करण्याबाबतचे प्रस्ताव समितीकडे सादर करावेत. आणि जी कामे सुरू होतील त्या कामांचा निधी वितरण केले येईल असेही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सन 2024- 25 व 25 -26 मध्ये ज्या शासकीय यंत्रणांनी निधी मंजूर असूनही अद्याप पर्यंत कामे सुरू केलेली नाहीत त्याविषयी माहिती दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 सर्वसाधारण अंतर्गत 991 कोटीचा निधी मंजूर असून सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी तांत्रिक मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी त्वरित प्रस्ताव पाठवावेत. यापुढे कोणत्याही प्रकारची मुदतवढ मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.
.png)
No comments:
Post a Comment