अक्कलकोटमध्ये २५ ऑगस्टला ‘नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलन’
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या १००व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरात ९९ नांदी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यापैकी अक्कलकोट येथे ‘नांदी ग्रंथपाल साहित्य संमेलन’ मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. मैंदर्गी रोडवरील कै. बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात हे संमेलन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोटच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव यांनी दिली.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी राहणार असून उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. योगेश सोमण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कार्यवाह आशुतोष जावडेकर, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगवले, म.सा.प.चे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, डॉ. श्रुतिश्री वडकबाळकर आणि कल्याण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उद्घाटनानंतर डॉ. योगेश सोमण यांचा ‘सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर दीर्घांकाचा एक प्रयोग’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे.
दुपारी २.३० वाजता ‘साहित्य चळवळीत ग्रंथालयाचे योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ग्रंथमित्र हरिदास रणदिवे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र गुलाबराव पाटील आणि ग्रंथमित्र जोतिराम गायकवाड सहभागी होणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता सोलापूर जिल्ह्यातील शतकोत्तर वाचनालयांमध्ये कार्यरत असलेल्या सात ग्रंथपालांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच प्रसिद्ध लेखिका सौ. आरती काळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सायंकाळी ४ वाजता काव्यवाचनाचा कार्यक्रम होणार असून बद्दीउजमा बिराजदार (सोलापूर) अध्यक्षस्थानी राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता संमेलनाचा समारोप होईल. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्माकर कुलकर्णी राहणार असून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, पंचायत समिती सदस्या कु. शितल म्हेत्रे, श्री काशीलिंग देवस्थान ट्रस्ट, जेऊरचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा आणि अश्विनी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी, वाचक, ग्रंथपाल तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोटच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव यांनी केले आहे.
यावेळी सौ. आरती काळे, सौ. पुष्पा हरवाळकर, प्रा. भीमराव साठे, लक्ष्मण पाटील, दत्तात्रय बाबर, दिनकर शिंपी, बापूजी निंबाळकर, सुभाष सुरवसे, राजू भोसले, कमलाकर सोनकांबळे, श्रीकांत झिपरे आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment