वैराग ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी निधीची मागणी
बार्शी (कटूसत्य वृत्त) :- बार्शी तालुक्यातील वैराग येथे डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर अंतर्गत कार्यरत असलेल्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी स्वतंत्र इमारत, पायाभूत सुविधा व आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
सध्या वैराग येथील विद्यमान रुग्णालयाच्या इमारतीत ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. मात्र केंद्रासाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉस्पिटल इमारत उपलब्ध नसल्याने आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निवासी डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवास व्यवस्था तसेच प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा नसल्याची बाब आमदार राऊत यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी केंद्राला स्वतंत्र इमारत व आधुनिक सुविधा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी नवीन सुसज्ज हॉस्पिटल इमारत, विद्यार्थी व निवासी डॉक्टरांसाठी आधुनिक वसतिगृह, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, तसेच अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वीज व इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या सुविधांमुळे केवळ बार्शी तालुकाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल, असेही आमदार राऊत यांनी नमूद केले.
आमदार राऊत यांची मागणी ऐकून घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित प्रस्तावाची तातडीने छाननी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळवून कामाला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment