आयएमए बार्शीच्या ‘स्वास्थ्य संवाद’मध्ये हृदयरोग जनजागृतीवर भर- डॉ संजय अंधारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

आयएमए बार्शीच्या ‘स्वास्थ्य संवाद’मध्ये हृदयरोग जनजागृतीवर भर- डॉ संजय अंधारे

 आयएमए बार्शीच्या ‘स्वास्थ्य संवाद’मध्ये हृदयरोग जनजागृतीवर भर- डॉ संजय अंधारे




बार्शी (कटूसत्य वृत्त):- हृदयरोगावर सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे जनजागृती आहे. वेळेवर झालेले अचूक निदान आणि योग्य उपचार यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात," असा सूर इंडियन मेडिकल असोसिएशन, बार्शी आयोजित “स्वास्थ्य संवाद” या विशेष उपक्रमात उमटला. या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 'ह्रदयरोग जनजागृती' परिसंवादात  डॉ संजय अंधारे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पॅनल कन्सल्टंट म्हणून  डॉ. काबरा सर, डॉ. खामकर सर आणि डॉ. साखरे सर यांच्यासोबत हृदयविकाराचे विविध पैलू, लक्षणे आणि आधुनिक उपचार पद्धतींवर सखोल चर्चा केली. तसेच उपस्थित बार्शीकरांशी थेट संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
यावेळी पुढे बोलताना डॉ संजय अंधारे म्हणाले की  छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला प्रचंड जडत्व किंवा वेदना जाणवणे, ही वेदना जबडा, मान किंवा डाव्या हाताकडे पसरणे, अचानक खूप घाम येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही हृदयविकाराची प्रमुख लक्षणे आहेत. अशा वेळी घरगुती उपाय किंवा गॅसचे औषध शोधण्यात वेळ न घालवता रुग्णाला तात्काळ जवळच्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे आहे. अचूक निदानासाठी(हृदयाची सोनोग्राफी) आणि रक्तवाहिन्यांमधील अडथळे तपासण्यासाठी ऑनजिओग्राफी या चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
आजकालच्या धावपळीच्या युगात हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करण्याचे आवाहन डॉ संजय अंधारे यांनी केले.
आहारात हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचा समावेश वाढवावा तर तेलकट पदार्थ, डालडा, पामतेल आणि जंक फूड पूर्णपणे टाळावे. दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे वेगाने चालणे किंवा सायकल चालवण्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी पुरेशी झोप व ध्यान आवश्यक असून, धूम्रपान व तंबाखूचे व्यसन त्वरित सोडणे गरजेचे आहे.
उपचार पद्धतींवर प्रकाश टाकताना डॉ संजय अंधारे यांनी सांगितले की, गरजेनुसार अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवला जातो किंवा गुंतागुंतीच्या केसेसमध्ये बायपास सर्जरी  करून पर्यायी रक्तपुरवठा मार्ग तयार केला जातो. ज्या रुग्णांची अशी शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रक्त पातळ करण्याच्या गोळ्या कधीही बंद करू नयेत, असा कडक सल्लाही यावेळी देण्यात आला.
तरुणांमधील वाढते प्रमाण आणि गैरसमज
"हृदयविकार फक्त वृद्धांनाच होतो" हा एक मोठा गैरसमज असून खराब जीवनशैली आणि तणावामुळे आज २५ ते ३० वयोगटातील तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, असे डॉ संजय अंधारे यांनी स्पष्ट केले. मात्र, योग्य उपचार, नियमित औषधे, योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने व्यक्ती पुन्हा सक्रिय आणि आनंदी जीवन जगू शकते, असा विश्वासही त्यांनी दिला.
या अत्यंत स्तुत्य आणि यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयएमए बार्शी कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व सहकारी डॉक्टर, उपस्थित मान्यवर आणि बार्शीतील विविध सामाजिक संस्थांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. या परिसंवादाला बार्शीतील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages