दिल्लीतील लाठीमाराविरोधात राज्यभर बंद; करमाळ्यातही सहभागाचे आवाहन
करमाळा (कटूसत्य वृत्त):- दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्षांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या महिनाभरापासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि आंदोलनकर्ते अभिजित दीपके हे विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांनी १९ दिवसांचे आमरण उपोषण केले असून, त्यांना आंदोलनस्थळावरून पोलिसांनी हटविल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, २० जुलै रोजी जंतर-मंतर मैदानावरून संसद भवनाकडे शांततापूर्ण मार्गाने निघालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात लाठीमार केला आहे. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगितले जात असून, अल्पवयीन मुलीसह आंदोलनकर्त्यांवरही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात यावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment