मुस्लिम परिसर व कब्रस्तान विकासासाठी फारूक शाब्दी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

मुस्लिम परिसर व कब्रस्तान विकासासाठी फारूक शाब्दी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

मुस्लिम परिसर व कब्रस्तान विकासासाठी फारूक शाब्दी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील मुस्लिम बहुल परिसरांचा विकास, कब्रस्तानांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच नवीन ड्रेनेज व्यवस्थेच्या सर्वांगीण सुधारणांसाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते फारूक शाब्दी यांनी गुरुवार, दि. 23 जुलै 2026 पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

फारूक शाब्दी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम परिसर, कब्रस्तानांचा विकास आणि नवीन ड्रेनेज व्यवस्थेसाठी सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र, सातत्याने मागणी करूनही आवश्यक निधी मंजूर करण्यात आलेला नसल्याने कब्रस्तानांमध्ये रस्ते, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संरक्षण भिंत, प्रकाश व्यवस्था, वृक्षारोपण, बसण्याची सुविधा यांसारख्या मूलभूत सोयींचा अभाव कायम असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, महानगरपालिकेच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात इतर समाजांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे स्वागत आहे. मात्र, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला. हा मुस्लिम समाजावरील अन्याय आणि भेदभाव असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

या संदर्भात स्थानिक आमदार, महापौर, स्थायी समितीच्या सभापती, सभागृह नेते आणि महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने घटनात्मक हक्कांसाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे शाब्दी यांनी स्पष्ट केले.

हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, समाज अथवा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून, मुस्लिम समाजाच्या न्याय्य मागण्या आणि कब्रस्तानांच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages