विद्यार्थ्यांनी साकारली जिवंत वारी; विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेने जिंकली सर्वांची मने - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

विद्यार्थ्यांनी साकारली जिवंत वारी; विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेने जिंकली सर्वांची मने

 विद्यार्थ्यांनी साकारली जिवंत वारी; विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेने जिंकली सर्वांची मने




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीचे औचित्य साधत टेंभुर्णी येथील श्री. शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये पारंपरिक पालखी सोहळा व रिंगण सोहळा अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि संस्कारमय वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषाने संपूर्ण शाळा परिसर भक्तीच्या रंगात रंगून गेला.
विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार, भारतीय संस्कृती आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य डॉ. प्रशांत होमकर व उपप्राचार्य श्री. शरद दादर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. श्री. सुदाम पांडुरंग लोंढे व सौ. स्मिता सुदाम लोंढे यांच्या शुभहस्ते पालखी पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामस्मरणात दंग होत टाळ-मृदंगाच्या साथीने पालखीची भव्य मिरवणूक काढली. उपस्थित पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात सहभागी होत वातावरण अधिकच भक्तिमय केले.
यावेळी वृक्षदिंडी, तुळशी वृंदावन दिंडी, टाळ दिंडी, पताका दिंडी आणि ग्रंथ दिंडी अशा विविध दिंड्यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की, उपस्थितांना प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीचा अनुभव मिळाला.
सोहळ्यातील रिंगण हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई तसेच इतर संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी आपल्या देखण्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाने कार्यक्रमाला चार चाँद लावले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, शिस्त, एकात्मता आणि भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला. उपस्थित पालकांनीही विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक करत अशा सांस्कृतिक आणि मूल्याधिष्ठित उपक्रमांचे स्वागत केले.
पालखीची आकर्षक सजावट कु. वैष्णवी मोहोळकर यांनी केली, तर कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. सॅम्युअल हरी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री. बाळासाहेब (काका) देशमुख, सचिव श्री. हर्षवर्धन (दादा) देशमुख, संचालक श्री. सूरज (भैय्या) देशमुख तसेच कार्यकारी संचालिका प्रियंका देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर शारदेय गुरुकुलमध्ये रंगलेल्या या भक्तिमय पालखी सोहळ्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही संस्कार, परंपरा आणि भक्तीचा अविस्मरणीय अनुभव दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages