जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत निषेध मोर्चा; भाजपवर जोरदार टीका
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार (दि. २३) रोजी टेंभुर्णीत विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, व्यापारी, वकील, डॉक्टर आणि शेकडो युवकांच्या सहभागाने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत टेंभुर्णीतील वंचित बहुजन आघाडीचे राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रॅली काढण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद देत टेंभुर्णी शहर कडकडीत बंद ठेवले.
मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी वडार परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर झालेला लाठीहल्ला हा लोकशाहीची गळचेपी करणारा असून विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच आंदोलनकर्त्यांवरील कारवाईची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अशा हुकूमशाही प्रवृत्तीचा देशभर निषेध झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुर्डूवाडी चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर वडार परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांनी मंडल अधिकारी शेळवणे यांना निवेदन सादर करून दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध नोंदविला. भविष्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील चांदजकर, प्रमोद कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप, वंचित बहुजन आघाडीचे महेंद्र सोनवणे, डॉ. राहुल पाटील, सामाजिक कार्यकर्ते विशाल नवगिरे, औदुंबर (भाऊ) देशमुख, ॲड. तुकाराम राऊत, डॉ. ज्योती अनंत कवळस, महेंद्र वाक्षे, क्रांती लोंढे, सुनील ओव्हाळ, वैभव कुटे, डॉ. पांडुरंग गायकवाड, भीमराव बंडगर, सुरेश लोंढे, कोंडार भागतील नेते गोविंद भाऊ पवार, नारायण गायकवाड, हरीभाऊ माने,बाबा चंदनकर, संतोष खैरमोडे,प्रशांत सोनवणे,गणेश केचे, सुनील ओहोळ,विकास बंदपट्टे, सुनील पवार, दादा पवार, समाधान पवार, रमेश पवार, अक्षय काळे, सचिन पवार, महादेव धोत्रे, महेश पवार, राहुल धोत्रे, सुरज धोत्रे, समाधान जाधव, राहुल कांबळे, सागर पवार तसेच वंचित बहुजन आघाडी, वडार परिवर्तन सेना, व्यापारी, वकील, डॉक्टर, विद्यार्थी , महीला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते महावीर वजाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजकुमार धोत्रे यांनी मानले.

No comments:
Post a Comment