जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने राबविलेले वृक्षारोपण अभियान यशस्वीरित्या संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीज धाम) यांच्या प्रेरणेने राबविण्यात आलेले 'एक भक्त, एक वृक्ष' हे पर्यावरण संरक्षण अभियान यशस्वीरित्या पार पडले. ५ जुलै ते १९ जुलै या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत देशभर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
या अभियानांतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्यात तब्बल १२ हजार ५७१ वृक्षांचे रोपण करण्यात आले, तर संपूर्ण देशभर ६ लाख १८ हजार ९ (६,१८,००९) वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
सोलापूर परिसरातील बाळूमामा मंदिर (बेलाटी), स्वामी नारायण गुरुकुल प्रशाळा (कुंभारी), हिरज, मार्डी, पाथरी, बीबी दारफळ, नान्नज, विडी घरकुल आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिक्षक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदवत अभियानाला सहकार्य केले.
अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर प्रमुख दिगंबर आवताडे, महिला अध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई उत्तरकर, युवा प्रमुख विनायक कांबळे, दादासाहेब नागटिळक, बाळू कदम, निखिल मठे, विजय गाडे, विशाल चव्हाण, सुधाकर फंड, मोहिते बुवा आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला असून, नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आयोजकांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment