शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे : प्राचार्य डॉ. नितीन मोटे
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक; साहित्य व बोर्ड परीक्षा शुल्काची मदत
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नसून सक्षम, प्रामाणिक आणि आत्मविश्वासू व्यक्तिमत्त्व घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याची गरज असून श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन राबविलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मोटे यांनी केले.
शिंदे चौक येथील शिवस्मारक सभागृहात श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उद्योजक केतन वोरा, अथर्व क्लिनिकचे डॉ. सुधाकर मोहोळे, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक आकाश मुंढे, सोलापूर महानगरपालिकेचे उपअभियंता अभिजित बिराजदार, लायन्स क्लब जुळे सोलापूरचे माजी अध्यक्ष सागर पुकाळे आदी प्रमुख उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मोटे म्हणाले, "श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान केवळ सामाजिक कार्य करत नाही, तर भविष्यातील सक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. अशा उपक्रमांना समाजातील दानशूर व्यक्तींनी अधिकाधिक सहकार्य करणे गरजेचे आहे."
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले, तर आभार अक्षता कासट यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगळे, रूपा कुताटे, सुजाता सक्करगी, भारती जवळे, ज्योती कासट, गणेश येळमेली, सुरेश लकडे, नागेश कोळी आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बोर्ड परीक्षा शुल्कासह शैक्षणिक साहित्याचे वाटप
या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग, तर नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, बॅग, कंपासपेटी तसेच बोर्ड परीक्षेच्या शुल्कासाठी आर्थिक मदत देण्यात आली. सोलापुरातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात यंदा ६१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले. गेल्या नऊ वर्षांत प्रतिष्ठानने एकूण ५११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
No comments:
Post a Comment