अकलूजची वाढती लोकसंख्या आणि तलावात पाणी मात्र तेवढेच- किशोरसिंह माने-पाटील
सुधारीत पाणी पुरवठा करण्याचे केली मागणी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज शहरात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून त्यासाठी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील यांनी थेट नगरपरिषदेत धाव घेत मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याशी चर्चा केली.वाढती लोकसंख्या आणि अपुरा पाणी पुरवठा यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्याशी चर्चा करताना माने पाटील यांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाय योजना सुचवल्या आहेत. अकलूजची दिवसेंदिवस लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असून त्यामानाने अकलूजचा पाणीपुरवठा मात्र पुर्वी होता तेवढाच आहे.त्यामुळे तातडीने उपाय योजना व व्यवस्था करावी लागेल असे त्यांनी सांगितले.त्यांनी नगरपरिषदेच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या बोअरवेलचा मुद्दा उपस्थित केला.शहरात ४६ बोअर आहेत.त्यापैकी किती बंद आहेत याचा आढावा घेऊन तातडीने ते चालू करावीत.खूप बोअरवेल नलिकेच्या पाईप लाईन बंद अवस्थेत आहेत.त्या ताबडतोब दुरुस्त करून अकलूजकरांना बोअरवेलचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली.
पाणी बचतीसाठी नागरिकात जनजागृती करणे ही गरजेचे असल्याचे सांगत माने-पाटील यांनी सार्वजनिक ठिकाणी भांडी धुण्यावर बंदी घालावी असा सल्ला दिला. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवावे लागेल. झोपडपट्टी भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी खास योजना सुचवली.झोपडपट्टी भागात पाण्याच्या टाक्या बसवून रात्री टँकरद्वारे त्यामध्ये पाणी भरावे.रात्री भरलेले पाणी दिवसा लोकांना वापरासाठी सोयीचे होईल.यामुळे पाणी वाटपाचा ताणही कमी होईल असे त्यांनी सांगितले.
बंद बोअरवेल चालू करणे,रात्रीच्या वेळी टाक्यामध्ये पाणी साठवणूक करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी नागरिकात जनजागृती करणे या त्रिसूत्रीने भीषण पाणी टंचाईवर मात करता येईल असा विश्वास माजी सरपंच किशोरसिंह माने-पाटील व्यक्त केला. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी त्यांच्या सूचनांची नोंद घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल गायकवाड,माजी सदस्य त्रिंबक तात्या गुळवे,सुरेश देशपांडे,शिरीष देशपांडे व नगरपरिषदेचे सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment