तलाव विकासासाठी नव्या ५ कोटींचा प्रस्ताव; जुन्या कामांवर विरोधकांचा सवाल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 15, 2026

तलाव विकासासाठी नव्या ५ कोटींचा प्रस्ताव; जुन्या कामांवर विरोधकांचा सवाल

तलाव विकासासाठी नव्या ५ कोटींचा प्रस्ताव; जुन्या कामांवर विरोधकांचा सवाल





सोलापूर (कटूसत्य वृत्त): विजापूर रस्त्यावरील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तलावाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव महापालिकेच्या २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला असून, यापूर्वी या तलावावर खर्च झालेल्या सुमारे १० कोटी रुपयांच्या कामांचा हिशेब आणि परिणाम यावर सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत मार्च महिन्यात मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा सविस्तर अहवाल माहितीस्तव ठेवण्यात येणार आहे. पूर्वीच्या कामांचे ठोस परिणाम दिसत नसताना पुन्हा नव्या कामांसाठी निधी खर्च करण्याच्या प्रस्तावाकडे नागरिकांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे.

केंद्र शासनाच्या नॅशनल प्लॅन फॉर कन्झर्वेशन ऑफ अॅक्वाटिक इको सिस्टिम योजनेअंतर्गत धर्मवीर संभाजी महाराज तलाव संवर्धन व सुशोभीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. एन्व्हिक्लीन असोसिएट्स, कोल्हापूर यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. १२ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने १२.२१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के, तर महापालिकेचा ४० टक्के निधी होता.

प्रकल्पातील १ एमएलडी एसटीपी आणि फ्लोटिंग रॅफ्टरची कामे नंतर रद्द करण्यात आली. मात्र तलावातील गाळ काढणे, जलपर्णी हटविणे, पाण्याची गुणवत्ता तपासणी, कारंजे उभारणे आणि परिसरातील स्थापत्य विकास अशी १०.०४ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी ९.०६ कोटी रुपये खर्च करून सप्टेंबर २०२३ मध्ये कामे पूर्ण झाल्याची नोंद आहे.

मात्र एवढा मोठा निधी खर्च होऊनही तलाव परिसरात त्या कामांचे अपेक्षित परिणाम किंवा अस्तित्व स्पष्टपणे दिसून येत नसल्याची टीका सातत्याने होत आहे. त्यामुळे जुन्या कामांचा आढावा न घेता पुन्हा त्याच परिसरासाठी नव्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने सभागृहात या विषयावर खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, स्वदेश दर्शन स्कीम २.० आणि डेस्टिनेशन टुरिझम डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांपैकी टप्पा क्रमांक १ साठी ४ कोटी ९९ लाख ९६ हजार ६३२ रुपयांचा प्रस्ताव आता २०२६-२७ मधील १०० टक्के शासकीय अनुदानित नावीन्यपूर्ण योजनेतून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्याची परवानगी मागण्यात आली आहे. यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक आहे.

स्मार्ट सिटीसह विविध शासकीय योजनांमधून कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेल्या विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी नव्या निधीची मागणी होत असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे सभागृह जुना खर्चाचा हिशेब मागणार की नव्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याची संकल्पना

धर्मवीर संभाजी महाराज तलाव माझ्या प्रभागात येतो. या तलावाचा सर्वांगीण विकास व्हावा, ही आमची भूमिका आहे. पूर्वी मोठा निधी खर्च झाला हे खरे असले तरी ती कामे प्रशासकीय काळात झाली आहेत. त्या कामांवर सभागृहात चर्चा होईल. मात्र आमदार देवेंद्र कोठे यांनी मांडलेली संकल्पना राबविली तर हा तलाव सोलापूरमधील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतो.

— नरेंद्र काळे, सभागृहनेते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages