गेला पाऊस कुणीकडे?; दीड महिना उलटला तरी पावसाची ओढ कायम
सोलापूर (कटूसत्य वृत्त): पावसाळ्याला सुरुवात होऊन दीड महिना उलटला तरी सोलापूर जिल्ह्यात अद्याप सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. तुरळक सरींचा अपवाद वगळता बहुतांश भागात उन्हाळ्यासारखीच परिस्थिती कायम असून, पावसाअभावी शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि जनावरांच्या चाऱ्याचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील भीमा, सीना, भोगावती, माण, हरणा आदी नद्यांची पात्रे अद्यापही बहुतांश ठिकाणी कोरडी आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असून जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. आकाशात ढग नसल्याने पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यंदा मे महिन्याच्या अखेरीस रोहिणी नक्षत्राने अपेक्षेप्रमाणे पाऊस दिला नाही. त्यानंतर मृग आणि आर्द्रा नक्षत्रातही समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या सुरू असलेल्या पुनर्वसू नक्षत्रातही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. आर्द्रा नक्षत्रात झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र त्यानंतर पाऊस न झाल्याने उगवलेली पिके कोमेजू लागली असून अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर, विशेषतः ऊस शेतीवर अवलंबून आहे. पावसाअभावी उसासह अन्य पिकांची वाढ खुंटली असून उन्हाळ्यात मोठ्या कष्टाने जपलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.
आता आशा पुष्य नक्षत्रावर
दाते पंचांगानुसार २० जुलैपासून पुष्य नक्षत्राला प्रारंभ होत असून, २४ ते ३१ जुलै तसेच १ ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अभ्यासकांनीही जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील पंधरा दिवसांवर खिळल्या आहेत.
मात्र, भारतीय हवामान विभागाच्या उपलब्ध अंदाजानुसार जुलैअखेरपर्यंतही जिल्ह्यात सर्वदूर आणि समाधानकारक पावसाची स्पष्ट शक्यता दिसत नसल्याने शेतकरी अधिकच धास्तावले असून, पावसाच्या प्रतीक्षेत संपूर्ण जिल्हा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
No comments:
Post a Comment