ठाकरे सेना-राष्ट्रवादीत दिलजमाई; कुर्डुवाडी पालिका सभेत १९ विषयांना मंजुरी
कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त): सत्ताधारी ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चार दिवसांपूर्वी झालेल्या दिलजमाईनंतर मंगळवारी झालेली कुर्डुवाडी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नगराध्यक्षा जयश्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण १९ विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेच्या प्रारंभी नगरसेविका भाग्यश्री पाटील यांनी आरोग्य, भटके कुत्रे, शहरातील पाणीपुरवठा आदी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत आपल्या प्रभागातील अडचणी सभागृहासमोर मांडल्या. बुधवारी वीजपुरवठा खंडित असतो, त्यामुळे त्या दिवशी पाणीपुरवठा करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
नगरसेविका वृषाली गांधी यांनी नगरपरिषदेच्या निधीचा उपयोग जनहिताच्या कामांसाठी व्हावा, यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.
आरोग्य सभापती डॉ. मोहसीन मकणू यांनी आषाढी वारीदरम्यान शहरात येणाऱ्या पालख्या आणि हजारो वारकऱ्यांच्या सुविधांकडे लक्ष वेधले. इतर नगरपालिकांप्रमाणे कुर्डुवाडीलाही वारीसाठी विशेष निधी मिळावा, यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच विविध कामांसाठी वारंवार जेसीबी भाड्याने घेण्याऐवजी नगरपालिकेने स्वतःचा जेसीबी खरेदी करावा, अशी मागणी पाणीपुरवठा सभापती अमरकुमार माने यांनी केली.
नगरसेविका अंजली गावडे यांनी गतवर्षी पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जगन्नाथ क्षीरसागर यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्या मांडल्या, तर सरस्वती क्षीरसागर यांनी शहरात नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. उजनी धरणात सुमारे ५० टक्के पाणीसाठा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मुख्याधिकारी महिन्यातून एकदाच येतात!
नगरसेविका भाग्यश्री पाटील यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे हे महिन्यातून केवळ एकदाच नगरपालिकेत येत असल्याने शहराच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याचा आरोप केला. त्यावर मुख्याधिकारी तपसे यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
सभेच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते समीर मुलाणी, उपनगराध्यक्षा सविता जगताप, शकील तांबोळी, ऋषिपाल वाल्मीकी यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

No comments:
Post a Comment